24.5 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeमहाराष्ट्रहेडलाईनसाठी उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर टीका

हेडलाईनसाठी उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर टीका

पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्रात हेडलाईन करायची असेल तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही. एका सशक्त लोकशाहीमध्ये आमच्या विरोधकांनाही टीका करायचा अधिकार आहे. अरे विरोधकही दिलदार असला पाहिजे. तसंच आम्ही लोकशाही वाले लोक आहोत, दडपशाही वाले नाही. असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी अमित शाहांना प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान, पुण्यातील भाजपच्या अधिवेशनावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केल्याने शरद पवार गट आक्रमक झाले आहे.

पुढे बोलताना सुळे म्हणाल्या, अमित शाह यांची टीका ऐकून मला हसू आले. अमित शाह यांना मी आठवण करून देऊ इच्छिते की, त्यांच्याच मोदी सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने शरद पवारांना सन्मानित केले आहे. ज्या लोकांवर भाजपानं भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ते आता अमित शाहांच्या भाजपाचे राज्याचे मंत्री आणि पदाधिकारी आहेत.

आमच्या सोबत काम केलेले अशोक चव्हाण हे तर मंचावर अमित शाहांच्या मागे बसलेले दिसले. त्यांच्यावर याच भाजपाने भ्रष्टाचाराचे कितीतरी आरोप केले होते. त्यामुळे भाजपाने भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्यांपैकी ९० टक्के लोक आज वॉशिंग मशीनमुळे भाजपात आहेत.

पुण्यात रविवारी (२१ जुलै) भाजपानं आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन आयोजित केलं होतं. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी अमित शाह यांनी ‘शरद पवार हे भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरगना (सरदार) आहेत,’ अशी खोचक टीका केली होती. तसंच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुनही त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR