परभणी : जिल्ह्यात स्वीप पथकाच्यावतीने विविध उपक्रमाद्वारे मतदान जनजागृती मोहिम राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वीप कक्षाच्या अंतर्गत मंगळवार, दि. २२ रोजी तहसील कार्यालय येथे परभणी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्या हस्ते होय! मी मतदान करणारच या माध्यमातुन स्वाक्षरी करूण स्वाक्षरी मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे, जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा वरिष्ठ अधिष्ठाता गणेश शिंदे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी स्वीप सदस्य अरविंद शहाणे, हनुमंत हंबिर, त्र्यंबक वडसकर, प्रवीण वायकोस, रामप्रसाद अवचार, प्रा.भगवान काळे, प्रफुल्ल शहाणे, मोहन आल्हाट, सुधाकर गायकवाड, शिवाजी कांबळे, अतुल सामाले, ज्ञानेश्वर पाथरकर, प्रसन्न भावसार, प्रा. प्रवीण लोणारकर, वैभव पुजारी, विशाल पाटिल, महेश शेवाळकर, नबी, बबन आव्हाड, का.रा. चव्हाण, शिवाजी वाघमारे, सुनील वाघ आदिनी पुढाकार घेतला.
मतदान प्रक्रियेमध्ये सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुका, शहर आदी ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होऊन होय! मी मतदान करणारच असा संकल्प करून मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभागी होण्यासाठी स्वाक्षरी मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन पथकाच्या वतीने करण्यात येत आहे.