अमेरिकेने मानले इराणचे आभार, संघर्ष निवळणार?
तेहरान : वृत्तसंस्था
अमेरिका आणि इराणमध्ये २८ फेब्रुवारीपासून युद्धाला सुरुवात झाली होती. हे युद्ध तब्बल ३९ दिवस चालले. अखेर ४० व्या दिवशी अमेरिका आणि इराणकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान, युद्धकाळात इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज जहाजांसाठी बंद केल्याने जगभरात ऊर्जा संकट निर्माण झाले होते. मात्र, आता इराणने होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जगाची चिंता मिटली आहे. दरम्यान, अमेरिकेने इराणचे आभार मानले.
जगाला जेवढ्या कच्च्या तेलाची गरज आहे. त्यातील सुमारे २५ टक्के वाहतूक याच मार्गाने होते. त्यामुळे होर्मुझचा सागरी मार्ग खुला होणे आवश्यक होते. अखेर इराणने हा मार्ग मोकळा केला आहे. या आधी अमेरिकेने इराणसोबत युद्धविरामाची घोषणा करतानाच ही अट घातली होती की, स्ट्रेट ऑफ होर्मुझ तातडीने जगासाठी ओपन करावा. मात्र, युद्धविरामानंतर इस्त्रायलचे लेबनॉनवर हल्ले सुरूच होते, त्यामुळे इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझ पूर्णपणे ओपन केला नव्हता. केवळ १५ जहाजांनाच या मार्गाने जाण्याची परवानगी होती. आता होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यात आली आहे.
इस्त्रायल आणि लेबनॉनमध्ये गुरुवारी युद्धविराम झाला. ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा करताच आता इराणने जगासाठी स्ट्रेट ऑफ होर्मुझ मार्ग खुला केला. इराणने आधीच इस्रायल-लेबनॉनमध्ये शस्त्रसंधी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. इराणचे परराष्ट्र मंत्री सैय्यद अब्बास अराघची यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत घोषणा केली. इराणने घेतलेल्या या निर्णयामुळे संपूर्ण जगाला दिलासा मिळाला आहे.
कच्च्या तेलाचे दर कमी होणार?
युद्धकाळामध्ये इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केला होता. स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद झाल्यामुळे जगावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं होतं. याचा भारताला देखील मोठा फटका बसला होता. देशात एलपीजी सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. कच्च्या तेलाचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढले होते. मात्र आता स्ट्रेट ऑफ होर्मूज पुन्हा एकदा सुरू झाल्यामुळे कच्च्या तेलाचे दर नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. तसेच कच्चे तेल आणि गॅसचा तुटवडा देखील दूर होणार असून पुन्हा एकदा परिस्थिती पूर्वपदावर येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
















