मुंबई : वृत्तसंस्था
टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर शिवम दुबे याने विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५ या हंगामात जबरदस्त सुरुवात केली आहे. शिवम दुबे याने मुंबईकडून खेळताना कर्नाटकाविरुद्ध विस्फोटक फलंदाजी केली आहे. शिवमने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम बी ग्राऊंड येथे पहिल्या डावात कर्नाटकाच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. शिवमने मैदानात चौफेर फटकेबाजी करत कर्नाटकाच्या गोलंदाजांचा समाचार घेत या हंगामात अप्रतिम सुरुवात केली. शिवमने अर्धशतकी खेळी केली. तसेच कॅप्टन श्रेयस अय्यर याच्यासह पाचव्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी केली.
कर्नाटकाने टॉस जिंकत मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडले. अंगकृष रघुवंशी ६, आयुष म्हात्रे ७८, हार्दिक तामोरे ८४ आणि सूर्यकुमार यादव २० धावा करून आऊट झाला. त्यामुळे मुंबईची ३३.३ ओव्हरमध्ये ४ बाद २३४ अशी स्थिती झाली. सूर्या आऊट झाल्यानंतर कॅप्टन श्रेयसची साथ देण्यासाठी शिवम दुबे मैदानात आला.
या जोडीने धमाका केला. एका बाजूने श्रेयसने फटकेबाजी केली. तर दुस-या बाजूला शिवमने तडाखेबंद बॅटिंग केली आणि अवघ्या ३२ बॉलमध्ये ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५१ धावांची खेळी केली. शिवमने एकूण ३६ बॉलमध्ये १७५ च्या स्ट्राईक रेटने ५ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद ६३ धावा केल्या. शिवमने फक्त १० बॉलमध्ये चौकार आणि षटकारांच्या मदतीने ५० धावा केल्या.
पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी
दरम्यान शिवम आणि श्रेयस या जोडीने पाचव्या विकेटसाठी नाबाद १४८ धावांची भागीदारी केली. या दोघांनी केलेल्या या भागीदारीमुळे मुंबईला ५० ओव्हरमध्ये ४ विकेट्स गमावून ३८२ धावांचा डोंगर उभा करता आला.