मुंबई : वृत्तसंस्था
जागतिक बाजारात प्रचंड उलथापालथ होत असून भारतीय शेअर बाजारही सर्वात वाईट अवस्थेतून जात आहे. जगात व्यापारयुद्ध सुरू झालं आहे. यामुळे देश-विदेशातील बाजारपेठांना मोठा फटका बसल्याचं दिसून येतंय. दरम्यान, ‘रिच डॅड पुअर डॅड’ या पुस्तकाचे लेखक आणि गुंतवणूकदार रॉबर्ट कियोसाकी यांनी एक भयावह भविष्यवाणी केली. रॉबर्ट कियोसाकी यांनी, शेअर बाजाराचा फुगा फुटत आहे आणि आपण इतिहासातील सर्वात मोठ्या मंदीच्या छायेत येऊ शकतो, असे म्हटले.
या घसरणीबाबत, ‘रिच डॅड्स’ मधून यापूर्वीच इशारा दिला होता, असं कियोसकी यांनी नमूद केलं. फुगा फुटत आहे. ही इतिहासातील सर्वात मोठी घसरण असू शकते याची भीती वाटत आहे. घाबरणे ही सामान्य बाब आहे. परंतु घाबरू नका आणि धीर धरा. २००८ मध्ये जेव्हा घसरण झाली होती, तेव्हा मी सर्वकाही थांबण्याची वाट पाहिली आणि नंतर मोठ्या प्रमाणात रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली, असं ते म्हणाले.
सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, जग ज्या मंदीच्या छायेतून जात आहे… ती तुमच्यासाठी जीवनातील मोठी संधीदेखील ठरू शकते. तुम्ही फक्त धीर धरा आणि शांत राहा, कियोसाकी यांनी स्ट्रॅटजी गुंतवणूकीवर भर दिला. रियल इस्टेट, सोनं, चांदी आणि बिटकॉईन सारख्या प्रमुख संपत्तींमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला.
१९२९ चाही रेकॉर्ड तुटणार
कियोसाकी यांनी इतिहासातील सर्वात मोठी घसरण होण्याचा इशारा दिला असून यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जागतिक बाजारात प्रचंड उलथापालथ सुरू आहे आणि ही इतिहासातील सर्वात मोठी आर्थिक घसरण असू शकते. अमेरिका, जर्मनी आणि जपानमधील आर्थिक संकटाने ही मंदी ज्यामुळे महामंदी आलेली अशा १९२९ च्या शेअर बाजारातील घसरणीपेक्षाही अधिक असू शकते अशी भीती आहे, असे रॉबर्ट कियोसाकी यांनी म्हटले.