पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील शेतक-यांंचे सन २०२३-२४ च्या खरीप व रबी हंगामातील थकीत पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत. याबाबत जिल्हा पातळीवर अनेक आंदोलने झाली. मात्र, खोट्या आश्वासनापलीकडे शेतक-यांच्या पदरात काहीच पडले नाही. राज्यात २१ लाख ४५ हजार ६६५ शेतक-यांना पीकविम्याची थकीत रक्कम येणे बाकी आहे. ही थकीत रक्कम २३०६ कोटी रुपये असून ती सरकारकडून कंपनीला देण्यात आली तरच ती शेतक-यांना वितरित केली जाऊ शकते.
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतक-यांच्या पिकांचे नुकसान झाले तर त्याला सुरक्षा कवच म्हणून पिक विमा दिला जाते. मात्र, अनेक नुकसानग्रस्त शेतक-यांना अद्यापही २०२३-२४ च्या खरीप व रबी हंगामातील पिक विम्याची मंजूर रक्कम मिळाली नाही. त्यामुळे स्वतंत्र भारत पक्षाने आणि शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिक घेतली आहे. शेतक-यांंना पिक विमा मिळावा, म्हणून पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. ९ सप्टेंबर रोजी काढण्यात येणा-या मोर्चाला महाराष्ट्र भरातून शेतकरी उपस्थित राहणार असल्याची माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली.
गेली दीड वर्ष शेतकरी आशेने वाट पाहात आहेत. मात्र, सरकार शेतक-यांना पैसे द्यायला तयार नाही. सरकारी अधिकारी व कंपन्यांनी दिलेली आश्वासने व तारखा खोट्या ठरल्याने पुन्हा शासनाचे लक्ष या महत्वाच्या विषयाकडे आकर्षित करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती घनवट यांनी दिली. सरकारने तातडीने पीक विम्याचे पैसे शेतक-यांच्या खात्यावर जमा न केल्यास या मोर्चात पुढील आंदोलनाची घोषणा करण्यात येणार आहे.
पुण्यात ९ सप्टेंबरला मोर्चा
येत्या ९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता पुणे स्टेशन येथील महात्मा गांधी पुतळ््यापासून मोर्चाला सुरुवात होणार आहे. अलंकार टॉकीज चौक, साधू वासवानी चौक मार्गे सेंटर बिल्डिंग येथील कृषी आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे.