लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषदेचा प्रशासक कालावधीतील चौथा अर्थसंकल्प मुख्य लेखा व वित्त अधिकारी आप्पासाहेब चाटे यांनी २३ कोटी ९४ लाख ११ हजार रूपये जमेचा(मागची शिल्लक ४० कोटी ६४ लाख) व ३५ कोटी ८० लाख ९१ हजार रूपये खर्चाचा असा वर्षाभरातील खर्च वजा जाता २९ कोटी ७ लाख ८५ हजार १०६ रूपयांचा शिल्लकी अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत सादर केला. त्यास प्रशासक तथा मुख्यकार्यकारी अधिकारी राहूल कुमार मिना यांनी मंजूरी दिली. प्रशासक कालावधीतील सलग चौथा अर्थसंकल्प सादर झाला आहे.
लातूर जिल्हा परिषदेच्या पार पडलेल्या अर्थ संकल्पीय सर्वसाधारण सभेस सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. प्रशासक कालावधीतील सलग चौथा अर्थसंकल्प सादर झाला. लातूर जिल्हा परिषदेत आगामी काळात निवडूण येणा-या पदाधिका-यांसाठी मानधन व इतर भत्यासाठी तरतूदीच्या बरोबरच जिल्हा परिषदेचे प्रशासन गतीमान करण्यासाठी, पारदर्शक, डिजीटलाईज व अधिक लोकाभिमुख करण्यासाठी, ई-गव्हर्नन्ससाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. तसेच जि.प. ने माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पुतळयासाठी १ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.