पुणे : प्रतिनिधी
विश्व शांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी, श्री क्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर परिसर विकास समितीच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. ४ जुलै २०२५ रोजी दुपारी १.३० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत ‘श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा पंढरपूर, वाखरी येथील पालखी तळाच्या शेजारी विश्वशांती गुरुकुल परिसरात होणार आहे.
वारक-यांनी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड व वारकरी कुस्ती महावीर स्पर्धेच्या संयोजन समितीचे सचिव प्रा. विलास कथुरे यांनी केले आहे.
स्पर्धेचे उद्घाटन माजी गृहमंत्री व राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व राज्य विधानसभेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. तसेच हिंद केसरी दीनानाथ सिंग, महाराष्ट्र केसरी पै. आप्पासाहेब कदम, महाराष्ट्र केसरी पै. विष्णूतात्या जोशीलकर व आमदार समाधान आवताडे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
अध्यक्षस्थानी श्री क्षेत्र आळंदी देहू, पंढरपूर परिसर विकास समितीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असतील.
आयोजित स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वारकरी मल्लांनी ४ जुलै २०२५ रोजी सकाळी ७.३० ते ११.३० वा. विश्वशांती गुरुकुलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपली नावनोंदणी करावी. सोबत वयाचा पुरावा म्हणून आपले आधार कार्ड किंवा शासनमान्य ओळखपत्र ठेवावे. अधिक माहितीसाठी श्री. विलास कथुरे मो. नं. ९८५०२ ११४०४ व डॉ. वैभव वाघ मो.नं. ८८८८१ १८४०० यांंच्याशी संपर्क साधावा.
विशेष आकर्षण म्हणजे योगमहर्षी वै. रामचंद्र गोपाळ शेलार ऊर्फ शेलारमामा यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ तंदुरुस्त अशा सत्तर वर्षे वयाच्या पुढील मल्लांसाठी याच दिवशी आगळीवेगळी कुस्ती स्पर्धा होईल. १६ ते २५ वयोगटातील विजेत्यास ‘कुमार वारकरी कुस्ती महावीर’ पुरस्कार, ५६ ते ६५ वयोगटातील विजेत्यास ‘वारकरी कुस्ती महावीर’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल.
तसेच थोर स्वातंत्र्यसेनानी, योगमहर्षी वै. रामचंद्र गोपाळ शेलार ऊर्फ शेलारमामा यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ तंदुरुस्त अशा ७० वर्षांच्या पुढील मल्लांसाठी याच दिवशी एक आगळीवेगळी विशेष कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्यास ‘ज्येष्ठ वारकरी कुस्ती महावीर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. विजेत्या कुस्ती महावीरांचा सन्मान-मानाचा फेटा, माऊलींची/जगद्गुरूंची प्रतिमा, शाल, स्मृतिचिन्ह, सुवर्ण/रौप्य/कांस्य पदक व रोख रकमेची बक्षिसे देऊन गौरव करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील या लोककलेला परत संजीवनी मिळावी म्हणून याच दिवशी रात्री ८.०० ते ११.०० वाजेपर्यंत, वारक-यांना अत्यंत प्रिय असलेल्या शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांचे प्रसिध्द असलेले नाथांचे भारूड व गवळणी ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.