रेणापूर : प्रतिनिधी
तालुक्यात गेल्या सहा दिवसा पासून सुरू असलेल्या वादळी वा-यासह अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे शेतकरी व सर्वसामान्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. कांदा, आंबा टोमॅटोसह इतर भाजीपाल्याचे मोठे नुकसान होत असल्याने शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. हा पाऊस ऊसासाठी उपयुक्त असला तरी फळबागांसाठी नुकसानीचा ठरत असून उन्हाळी हंगामातील पिकांना याचा मोठा फटका बसला आहे.
गत सोमवार दि. १९ मे पासून तालुक्यात मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वादळी वा-यासह मुसळधार पाऊस पडत आहे. गुरुवारी दि. २२ वादळी वा-यामुळे गव्हाण, समसापूर, इंदरठाणा अन्य गावातील घरावरील पत्रे उडाली, अनेक जुने घरे कोसळून मोठया प्रमाणात घरांचे नुकसान झाले. बहुतांश करून एप्रिल आणि मे महिन्यात शेतीच्या मशागतीची कामे आटोपली जातात. परंतु या वर्षी रब्बी पिकांची काढणी उशिरा झाली. त्यामुळे शेतक-यांना वेळेवर शेतीची कामे करता आली नाहीत. शेतीची मशागत करायची कशी आणि तोंडावर आलेली खरिपाची पेरणी करायची कशी असा प्रश्न शेतक-यांसमोर उभा राहिला आहे.
गेल्या पाच सहा दिवसांत तालुक्यात वादळी वा-यासह होत असलेल्या पावसाने, जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळी वा-यामुळे वीजेचे खांब कोसळल्याने व तारा तुटल्याने अनेक गावात वीज पुरवठा खंडीत झाला आहे तर कांही गावात वीज पुरवठा सुरळीत झाला असला तरी वारंवार वीज गुल होत आहे परिणामी जनतेला अंधारात रात्री जागून काढव्या लागत आहेत. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने शेताला छोटया तळ्याचे स्वरूप आले आहे त्यामुळे शेतीचे बांध फुटत आहेत. लहान ओढे व नाले भरून वाहत आहेत परिणामी शेतीला मोठा फटका बसत आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.
आंब्याच्या झाडाला एकही आंबा राहिला नाही. कांही ठिकाणी विज पडून पाच जनावरे दगावली असून इंदरठाणा या गावत एका सालगड्याचा मृत्यू झाला. नियोजित वेळेच्या एक आठवडा अगोदरच मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक गावात ऊस व इतर उन्हाळी पिके पाण्याअभावी वाळत होती. अशा पिकांना पाण्याची नितांत गरज होती. अचानक अवकाळी पाऊस सुरू झाला त्यामुळे जमिनीत ओलावा निर्माण होऊन ऊस व इतर पिकांना अक्षरश: संजीवनीच मिळाली आहे. या पावसामुळे ऊसउत्पादक शेतकरी आनंदीत झाले आहेत. मागील वर्षी उसाला उतारा कमी आला होता या वर्षी त्याची कसर भरून निघेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या अवकाळी पावसाचा उसाला फायदा झाला असला तरी फळबागा व भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे.