17.5 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeलातूर७५ ग्रामपंचायतींकडून मध्यम जोखीमचे पाणी

७५ ग्रामपंचायतींकडून मध्यम जोखीमचे पाणी

लातूर : प्रतिनिधी
विहीर, बोअर, नळ या सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे गावनिहाय, स्त्रोत निहाय ऑक्टोबर मध्ये स्वच्छता सर्वेक्षण जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले. त्यात लातूर जिल्हयातील ७८६ ग्रामपंचायती पैकी ७५ ग्रामपंचायती नागरीकांना मध्यम जोखीमेचे पाणी पिण्यास पुरवठा करत असल्याने या ग्रामपंचायतींना आरोग्य विभागाने पिवळे कार्ड दिले आहे.यात लातूर, निलंगा, जळकोट, रेणापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

लातूर जिल्हयातील ७८६ ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरी, बोअर, नळाच्या पाण्याच्या स्त्रोतांचे स्वच्छता व पाणी गुणवत्तेचे वर्षातून दोनदा मान्सून पूर्व व मान्सून पश्चात सर्व्हेक्षण करण्यात येते. त्यापैकी पावसाळया नंतरचे पाण्याच्या स्त्रोतांचे सर्व्हेक्षण १ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले. जिल्हयातील नागरीकांना जलजन्य आजार होऊ नयेत म्हणून गावाला पाणी पुरवठा होणा-या नळ, विद्यूत पंप, हात पंप, आड, विहिरीचा परिसर स्वच्छ आहे का ? पाण्याचे स्त्रोत कसे आहेत. या नुसार अ, ब, क या विहित नमुन्यातील सर्व्हेक्षण आरोग्य अधिकारी, जलसुरक्षक यांच्या मार्फत करण्यात आले. यात ७५ ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड दिले. यात जळकोट तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीे, लातूर तालुक्यातील ४५ ग्रामपंचायती, निलंगा तालुक्यातील २२ ग्रामपंचायती, रेणापूर तालुक्यातील २ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर ७०९ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड दिले आहे. तसेच लाल कार्ड असलेली अतिजोखीमेची एकही ग्रामपंचायत दिसून आली नाही.

स्वच्छता सर्व्हेक्षणात पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोता भोवतालचा परिसर, १५ मिटर अंतरापर्यत सांडपाणी साचून राहते का, शौचालय, गाईगुराचा गोठा स्त्रोतापासून १५ मिटर अंतरात उंचावर आहे का, टाकीतून गावाला पाणी पुरवठा होणा-या पाईप लाईनला व्हॉल्व, नळगळती आहे का, टाकी तीन महिण्यातून एकदा स्वच्छ करून टाकीवरती ऑईल पेंटने तारीख लिहिली आहे का, स्त्रोतापासून ते टाकीपर्यतची पाईप लाईन गटारी खालून गेली आहे का हे तपासून आरोग्य अधिकारी पिण्याच्या पाण्याची जोखीम ठरवतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR