धाराशिव : प्रतिनिधी
मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याची आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा बांधवांसाठी सातारा गॅझेट लागू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर हे गॅझेट लागू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण मराठवाड्यातील ८ गावांनी हैदराबाद गॅझेटला विरोध केला. या गावक-यांनी सातारा गॅझेट लागू करण्याची मागणी केल्याने प्रशासनासमोर पेच पडला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील ८ गावांमध्ये सातारा गॅझेट का? हैदराबाद गॅझेट याविषयी संभ्रम का असा सवाल यानिमित्ताने समोर आला आहे. त्यामागील कारणही गावक-यांनी दिले आहे. १९८२ पर्यंत धाराशिव जिल्ह्यातील ९ गावांचा समावेश सोलापूर जिल्ह्यामध्ये तर आता धाराशिव जिल्ह्यामध्ये असल्याने संभ्रम निर्माण झाल्याचे गावक-यांचे म्हणणे आहे.
कुणबी नोंदी शोधण्यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट का? सातारा गॅझेट या संदर्भात स्पष्ट माहिती द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये मराठवाड्याची माहिती तर सातारा गॅझेटमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील माहिती असल्याचे गावक-यांचे म्हणणे आहे. १९८२ पर्यंत ही गावे सोलापूर जिल्ह्यात होती. म्हणजे सातारा गॅझेट त्यांना लागू होणार असा त्यांचा दावा आहे. या सर्व घडामोडींमुळे प्रशासन आता पेचात पडले आहे.
या गावांनी केली सातारा गॅझेटची मागणी
याविषयीचे मोडी लिपीतील सर्व पुरावे कसबे तडवळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या रेकॉर्डमध्ये उपलब्ध आहेत. आंबेजवळगा, कौडगाव, येडशी,जवळा, दुधगाव, कसबे तडवळा ,गोपाळवाडी, कोंबडवाडी अशा ८ गावांचा १९८२ पर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये समावेश होता. या ८ गावांतील ग्रामस्थ कुणबी नोंदी शोधण्यासाठी संभ्रमात आहेत, प्रशासनाने लवकरात लवकर याविषयी माहिती स्पष्ट करून जनजागृती करण्याची मागणी केली आहे.
सातारा गॅझेट, औंध गॅझेटबाबत लगबग
सातारा गॅझेट लागू करण्याबाबत प्रशासकीय स्तरावर लगबग सुरू झाली आहे. याविषयी समितीच्या बैठकांना वेग आला आहे. येत्या काही दिवसांत सातारा गॅझेट लागू करण्याची तयारी प्रशासन स्तरावर सुरू झाली आहे. तर औंध गॅझेट लागू करण्याविषयी पण चाचपणी सुरू आहे. औंध गॅझेटमधील नोंदी तपासणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील मराठा कुणबी नोंदीची स्पष्टता समोर येणार आहे.

