आयोग मोठ्या निर्णयाच्या तयारीत?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय कर्मचा-यांसाठी आठव्या वेतन आयोगाची घोषणा झाली आहे. आता लवकरच आयोगातील सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. नवीन वेतन आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती एप्रिल २०२५ मध्ये होईल. हा आयोग केंद्रीय कर्मचा-यांना पगारासोबत मिळणा-या भत्यासंदर्भात निर्णय घेणार आहे. वेतन आयोगात महागाई भत्ता शून्य होण्याची शक्यता आहे. परंतु त्याला अजून दुजोरा मिळालेला नाही.
सध्या केंद्रीय कर्मचा-यांना त्यांच्या बेसिक पगारावर ५३ टक्के डीए मिळतो. केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या आठव्या वेतन आयोगात महागाई भत्त्यासंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या केंद्र सरकार वर्षात दोन वेळा महागाई भत्ता वाढवते. पहिली वाढ जानेवारी ते जून महिन्यांसाठी असते. दुसरी वाढ जुलै ते डिसेंबर महिन्यासाठी असते. हा महागाई भत्ता ३ ते ४ टक्के वाढवला जातो. परंतु आठव्या वेतन आयोगात महागाई भत्ता शून्य करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वेतन पद्धतीत होऊ
शकतो मोठा बदल?
माध्यमांमधील वृत्तानुसार, आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी जानेवारी २०२६ मध्ये लागू होण्याची शक्यता आहे. तसेच या शिफारशीमध्ये केंद्रीय कर्मचा-यांच्या पगारात मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे. सध्या डीएचे कॅलकुलेशन बेसिक सॅलरीवर होत आहे. यापूर्वी कोरोना काळात केंद्राने सर्व कर्मचा-यांचा महागाई भत्ता थांबवला होता.