17.5 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeहिंगोलीहिंगोलीत १ कोटी ४० लाखांची रोकड पकडली

हिंगोलीत १ कोटी ४० लाखांची रोकड पकडली

हिंगोली : प्रतिनिधी
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. हिंगोली शहरातील बसस्थानक परिसरात शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून वाहनांची तपासणी सुरू असताना दोन वाहनांत १ कोटी ४० लाख रूपयांची रोकड आढळून आली. या कारवाईमुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यात हिंगोली, वसमत व कळमनुरी विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगबग सुरू आहे. तर निवडणूक काळात गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ठिकठिकाणी वाहनांची तपासणी केली जात आहे. यासाठी काही पथकेही नियुक्त केली आहेत. दरम्यान, हिंगोली शहरातून मोठी रोकड नेली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून शुक्रवारी पथकाने बसस्थानक परिसरात वाहनांची तपासणी सुरू केली होती.

यावेळी दोन कारमध्ये नोटांची बंडले आढळून आली. वाहनांत रोक्कड सापडल्याची माहिती मिळताच निवडणूक विभागाचे पथकही दाखल झाले. यावेळी नोटांची तपासणी केली असता यात तब्बल १ कोटी ४० लाख ३७ हजार ५०० रूपयांची रक्कम असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही रोकड कोणाची आहे, रक्कम कोठून आणली, कुठे नेली जात होती? या रक्कमेचा राजकीय उमेदवारांशी काही संबंध आहे याबाबतची माहिती पोलिस घेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR