सोलापूर : प्रतिनिधी
सोलापुरातून धक्कादायक माहिती समोर येत आहे, जन्मदात्या आईने अवघ्या १० महिन्यांच्या बाळाची निर्घृण हत्या केली. धक्कादायक म्हणजे पतीच्या जाचाला कंटाळून तिने हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. या घटनेनंतर महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरातील बार्शी येथील रहिवाशी असलेल्या पूजा खुर्दामळेचा पती योगेश खुर्दामळे हा तिचा छळ करायचा. पूजा आणि योगेशला दोन मुली आहेत. एक १० महिन्यांची तर दुसरी ६ वर्षांची. योगेशच्या सततच्या छळाला पूजा कंटाळली होती. दरम्यान तिने संतापाच्या भरात १० महिन्यांच्या मुलीचा गळा दाबून पाण्याच्या बादलीत बुडवून निर्घृण हत्या केली.
पूजा एवढ्यावरच थांबली नाही तिने मोठ्या मुलीला देखील जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र ‘ आई, मी शाळा शिकते, मला मारू नकोस, अशी आर्त विनवणी केल्यानंतर तिने तिला सोडून दिल्याची माहिती आहे. हत्येनंतर मृत चिमुकलीला खांद्यावर घेऊन आरोपी महिला थेट बार्शी शहर पोलीस ठाण्यात पोहोचली. ‘माझ्या पतीच्या त्रासाला कंटाळून मुलीची हत्या केली, मला अटक करा,’ अशी कबुली तिने पोलिसांना दिली.
पोलिसांनी तातडीने मृत मुलीला रुग्णालयात दाखल केले. ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी १० महिन्यांच्या शक्तीला मृत घोषित केले. तसेच मोठी मुलगी तेजल हिने पोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. पोलिसांनी आरोपी पूजा योगेश खुर्दामळे हिच्याविरुद्ध इठर कलम १०३(१) आणि १०९ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून बार्शी शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.
















