नवी दिल्ली : अयोध्येतील राम लल्लाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असून लांबलचक रांगा लागत आहेत. दरम्यान, बुधवारी माध्यमांशी बोलताना रॅपिड अॅक्शन फोर्सचे (आरएएफ) डेप्युटी कमांडंट अरुण कुमार तिवारी म्हणाले, भाविकांची गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. मंदिराच्या आत आणि बाहेर सुमारे १ हजार सैनिक तैनात करण्यात आले आहेत. तैनाती पुढे अजून काही दिवस असणार आहे. राम मंदिरातच नव्हे तर शेजारील हनुमान गढी मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेतली. यावेळी त्यांनी आपल्या प्रमुख मंत्र्यांना भव्य मंदिराची भेट पुढे ढकलण्याचा सल्ला दिला. मोदींनी भक्तांची प्रचंड गर्दी आणि मंदिराच्या शहरात व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपी दौऱ्यांमुळे होणार्या गैरसोयींबद्दल चिंता व्यक्त केली. केंद्रीय मंत्र्यांनी मार्चमध्ये त्यांच्या अयोध्या भेटीची योजना आखली पाहिजे किंवा ती पुढे ढकलली पाहिजे, जेणेकरून सुव्यवस्थित अनुभव मिळेल, असे पाठाप्रधान म्हणाले.
बुधवारी मंदिर दर्शनासाठी खुले होण्यापूर्वी दर्शनार्थी भाविक आणि स्थानिकांमध्ये जल्लोष आणि उत्साह पाहण्यासारखा होता. श्री रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा आणि सोमवारी भव्य उद्घाटन झाल्यानंतर मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. मंगळवारी पहिल्याच दिवशी सुमारे पाच लाख भाविक दर्शनासाठी आल्याने पवित्र नगरीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती.