नवी दिल्ली : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असून एलपीजी सिलेंडरच्या किमतीत तब्बल १०३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. १९ किलोच्या कमर्शियल सिलेंडरच्या किमतींत ही वाढ झाली आहे. घरगुती सिलेंडरच्या किमतींत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कमर्शियल सिलेंडरच्या दरांत वाढवण्यात आलेल्या किमतींचा प्रभाव खाद्य उद्योग आणि रेस्टॉरंट व्यवसायावर दिसून येईल.
१ नोव्हेंबरपासून, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत १७८५.५० रुपयांवर आली असून १०१.५० रुपयांनी महागली आहे. ऑक्टोबरमध्ये त्याचे दर १६८४ रुपये होते. दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत १८३३ रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. गेल्या महिन्यात १ ऑक्टोबर रोजी कमर्शियल सिलेंडरची किंमत १७३१.५० रुपये होती. दिल्लीत आजपासून कमर्शियल एलपीजी १०१.५० रुपयांनी महाग झाला आहे. कोलकातामध्ये एलपीजीची किंमत १०३.५० रुपयांनी वाढून १९४३ रुपयांवर पोहोचली आहे, तर गेल्या महिन्यात त्याचा दर १८३९.५० रुपये झाला होता.