मुंबई/जळगाव : दिवसेंदिवस सोन्याच्या दरात मोठी वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सोन्याच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे. दरम्यान, मागील वर्षीचा गुढीपाडवा ते यावर्षीचा गुढीपाडवा या वर्षभरात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली. मिळालेल्या माहितीनुसार वर्षभरात सोन्याच्या दरात १३ हजार रुपयांची वाढ झाली आहे.
आज गुढीपाडव्याचा सण आहे. यानिमित्त मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीच्या खरेदीत वाढ झाली. दर वाढूनही खरेदीत वाढ होतेय. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सोने खरेदी करणे कठीण झाले आहे. दरम्यान, गुंतवणुकीच्या दृष्टीने अनेक लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. ही गुंतवणूक मोठी फायद्याची ठरत आहे. दरम्यान, वायदे बाजारात सोन्याच्या दराने विक्रमी पातळी गाठली आहे. सध्या सोन्याचा दर हा ७१७०० रुपयांवर गेला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत १३ हजार रुपयांची वाढ झाली आहे. मागील वर्षी याच काळात सोन्याचे दर हे ५८८०० रुपये होते. मात्र, वर्षभरात १० ग्रॅम सोन्यामागे १३ हजार रुपयांची वाढ झाली आहे.
सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता
सोन्याने गेल्या वर्षभरात २२ टक्के परतावा दिला आहे. हा मागील १० वर्षातील सर्वोत्तम परतावा आहे. भू राजकीय स्थितीमुळे सोन्याच्या दरात वाढ होतेय. ही वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात अक्षय तृतीया येणार आहे. या काळातही सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दुसरीकडे चीन मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहे. यामुळे देखील सोन्याच्या दरात वाढ होतेय.