पुणे (खेड) : पुण्यातील खेड तालुक्यातील दुर्गम भागात असणा-या कळमोडी धरण परिसरात असणा-या घोटवडी येथे एका १३ वर्षीय विद्यार्थिनीचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मोनिका सुरेश भवारी (वय १३) असे पाझर तलावात बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ही घटना २१ नोव्हेंबर रोजी घडली आहे. मात्र, पोलिसांकडून याबाबत माहिती देण्यास उशिरा झाल्याने घटना उशिरा समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील दुर्गम भागात असणा-या परसुल खोपेवाडी येथे मोनिका ही रानामध्ये जनावरे चारण्यासाठी घेऊन गेली होती. जनावरे दिवसभर या परिसरात चरत होती. सायंकाळ झाली जनावरे चरून घरी आली. मात्र, मोनिका आली नाही.
त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी जनावरे चारत असलेल्या परिसरात जाऊन पाहिले त्यावेळी त्यांना तिचे जर्किन (स्वेटर) आणि चप्पल आढळून आली. त्यानंतर त्यांनी शोधाशोध सुरू केली. मात्र, तरीही तिचा तपास लागला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत खबर दिली. त्यानंतर पोलिसांनी दुस-या दिवशी २२ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास पाझर तलावातून मोनिका हीचा मृतदेह बाहेर काढला.