पुणे : एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या म्हणजेच १५० कि.मी.पेक्षा जास्तच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणा-या पूर्ण तिकीट धारक (सवलतधारक प्रवासी वगळून) प्रवाशांना तिकीट दरात १५ टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना दिवाळी व उन्हाळी सुटीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे. या योजनेची सुरुवात १ जुलैपासून करण्यात येत आहे. प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
१ जूनला एस टी च्या ७७ व्या वर्धापन दिन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कमी गर्दीच्या हंगामामध्ये लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणा-या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांच्या तिकिटांमध्ये १५ टक्के सूट देण्यात येईल, अशी घोषणा केली होती त्यानुसार ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी १ जुलैपासून लागू करण्यात येत आहे. अर्थात, ही योजना पूर्ण तिकीट काढणा-या प्रवाशांसाठीच लागू राहणार आहे.
आषाढी एकादशी व गणपती उत्सवात प्रवाशांना लाभ
आषाढी एकादशीला व गणपती उत्सवासाठी आगाऊ आरक्षण करणा-या प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. राज्यभरातून पंढरपूर येथे जाणा-या नियमित बसेसचे आरक्षण प्रवाशांनी केल्यास त्यांना त्यांच्या तिकीट दरात १५ टक्के सवलत १ जुलै २०२५ रोजी लागू होत आहे. तथापि जादा बसेससाठी ही सवलत लागू असणार नाही. तसेच गणपती उत्सवासाठी कोकणात जाणा-या चाकरमानी प्रवाशांना आगाऊ आरक्षण केल्यानंतर या तिकिटाचा लाभ घेता येऊ शकतो.
ई-शिवनेरीच्या प्रवाशांना लाभ
मुंबई-पुणे मार्गावर धावणा-या एसटीच्या प्रतिष्ठित ई-शिवनेरी बसमधील पूर्ण तिकीट काढणा-या प्रवाशांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल. आगाऊ आरक्षण करणा-या प्रवाशांनी प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर, public.msrtcors.com या एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा msrtc Bus Reservation या मोबाईल अॅपद्वारे तिकीट आरक्षित केल्यास त्यांना १५ टक्के सवलत प्राप्त करता येऊ शकते.