26.7 C
Latur
Friday, February 21, 2025
Homeमहाराष्ट्रशुक्रवारपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यावर १५०० रुपये येणार

शुक्रवारपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यावर १५०० रुपये येणार

अर्थ खात्यातून ३४९० कोटी रुपये वर्ग

मुंबई : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतील फेब्रुवारीचा हप्ता वेळेच्या आधीच मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीचा हप्ता उद्यापासून द्यायला सुरुवात होणार आहे. यासाठी वित्त विभागाकडून ३४९० कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. दरम्यान, यावेळी जानेवारीच्या तुलनेमध्ये फेब्रुवारीत लाभार्थींची संख्या घटण्याची शक्यता आहे.

लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार? असा सवाल उपस्थित केला जात होता. पण आता उद्यापासूनच लाडकी बहिण योजनेचा हप्ता शेतक-यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. डिसेंबर अखेर २ कोटी ४६ लाख महिला लाभार्थी होत्या. त्यातील ५ लाख महिला अपात्र झाल्यानंतर जानेवारीअखेर २ कोटी ४१ लाख लाभार्थी महिला होत्या. मात्र, अद्याप फेब्रुवारी अखेरची आकडेवारी आलेली नाही. मात्र, त्यातही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कमी केलेल्या महिलांची संख्या ९ लाख होणार आहे. यापूर्वी ५ लाख महिलांची नावे कमी करण्यात आली होती. आता नव्याने ४ लाख महिलांची संख्या कमी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या ९४५ कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती आहे. नमो शेतकरी योजनेचा लाभ आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणा-या ५ लाख महिला आहेत. या महिलांना लाडकी बहिण योजनेतील फक्त ५०० रुपये मिळणार तर नमो शेतकरी योजनेतून १००० रुपये मिळणार आहेत. दिव्यांग विभागातून लाभ मिळणा-या महिलांना लाडकी बहीण योजनेतून त्यांना वगळले जाणार आहे. वाहने असलेल्या अडीच लाख महिला आहेत त्यांना ही यातून वगळण्यात आले आहे. सोबतच निकषात न बसणा-या अनेक महिला आहेत त्यांनी ही पैसे परत करायला सुरुवात केली आहे.

राज्य सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात आली होती. या योजनेच्या अंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजाराचा लाभ दिला जातो. २१-६५ वयोगटातील ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे. त्यांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा होतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR