25.8 C
Latur
Friday, December 27, 2024
Homeमहाराष्ट्र६० दिवसांत राज्यात १६७ शेतक-यांच्या आत्महत्या

६० दिवसांत राज्यात १६७ शेतक-यांच्या आत्महत्या

कर्जमाफी करून राज्याला विशेष पॅकेज द्या किसान सभेची सरकारकडे मागणी निवडणुकीच्या काळातील आकडेवारी जारी

मुंबई : राज्यात सातत्याने शेतक-यांच्या आत्महत्या होताना दिसत आहे, नापिकी, कर्जबाजारीपणा, दुष्काळ अशा विविध कारणांनी शेतकरी आपले आयुष्य संपवत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या ६० दिवसाच्या काळात विदर्भातील तब्बल १६७ शेतक-यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे.

महाराष्ट्रात उर्वरित ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारे शेतक-यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे वक्तव्य किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी केले आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं ही बाब लक्षात घेत महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज देत शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी पावले टाकावीत अशी मागणी किसान सभेनं केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या ६० दिवसाच्या काळात विदर्भातील तब्बल १६७ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. उर्वरीत राज्यात देखील अशा आत्महत्या वाढत आहेत असे डॉ. अजित नवले म्हणाले. शेतीमालाचे भाव सातत्याने पाडण्याचे धोरण, वाढता उत्पादन खर्च व नैसर्गिक आपत्तीत होणारे शेतक-यांचे नुकसान या प्रमुख कारणांमुळे शेतक-यांच्या या आत्महत्या वाढत असल्याचे अजित नवले म्हणाले.

शेतीमालाला रास्त भाव द्यावा
केंद्र सरकारने शेतकरी आत्महत्येची बाब लक्षात घेत महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे अशी मागणी अजित नवले यांनी केली आहे. तसेच सरकारने शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी पावलं टाकावीत. शेतक-यांचे संपूर्ण कर्ज माफ करुन शेतीमालाला रास्त दर देत, नैसर्गिक आपत्ती शेतक-यांना दिलासा देणारी धोरण घ्यावीत. महाराष्ट्रात वाढत असलेल्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर वरील प्रमुख बाबींचा समावेश असणारे दिलासा पॅकेज शेतक-यांना द्यावे, अशी मागणी किसान सभेच्या वतीने आम्ही करत असल्याचे अजित नवले म्हणाले.

आत्महत्याग्रस्त भागाकडे शासनाचे दुर्लक्ष
राज्यात विविध कारणामुळे शेतक-यांच्या आत्महत्या वाढत आहेत. सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, हवामानातील बदल, शेत मालाला भाव नसणे इत्यादी अनेक कारणास्तव मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त भागाकडे शासनाने विशेष लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. तसेच आत्महत्यांसाठी कारणीभूत ठरणा-या अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी देखील प्रयत्न करणं गरजेचं आहे. या आत्महत्या रोखण्यासंदर्भात शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे? असा सवालही करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR