नैरोबी : केनियामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील शाळेच्या वसतिगृहाला लागलेल्या आगीत १७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, १३ जण गंभीर जखमी झाले आहेत अशी माहिती आज पोलिसांनी दिली. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिस प्रवक्ते रेसिला ओन्यांगो म्हणाले की, गुरुवारी रात्री न्यारी काउंटीमधील हिलसाईड एंडराशा प्रायमरी येथे आग लागली आणि ही दुर्घटना घडली. दरम्यान, आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आले नसून, पोलिस तपास करत आहेत.
केनियाच्या निवासी शाळांमध्ये आग लागण्याच्या घटना सामान्य आहेत. येथील निवासी शाळांमध्ये राहणा-या विद्यार्थ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. कारण पालकांचा असा विश्वास आहे की, निवासी शाळांमध्ये राहिल्याने त्यांच्या मुलांना अभ्यासासाठी अधिक वेळ मिळतो. मात्र अशा घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. अलीकडच्या काळात केनियामध्ये शाळांना आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. या घटनांमुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना धोका तर निर्माण होत आहेच, पण देशाच्या शिक्षण व्यवस्थेसाठीही ते गंभीर आव्हान बनले आहे.