21.5 C
Latur
Saturday, February 24, 2024
Homeराष्ट्रीय१७ वी लोकसभा गेमचेंजर

१७ वी लोकसभा गेमचेंजर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या पाच वर्षांत देशात रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रॉन्सफॉर्मचे काम सुरू आहे. १७ व्या लोकसभेत दहशतवादविरोधात कठोर कायदे केले. काश्मीरचा ३७० हटविला. तिहेरी तलाक कायदा महिला शक्तीला मुक्ती देऊन गेला. नारीशक्तीलाही सक्षम केले. या काळात अनेक सुधारणा झाल्या. त्यामुळे या माध्यमातून गेमचेंजर २१ व्या शतकाचा भक्कम पाया घातला गेला. येणारी २५ वर्षे देशासाठी महत्त्वाची आहेत. राजकारण, महत्त्वाकांक्षा आपल्या जागी. परंतु देशाच्या अपेक्षा, आकांक्षा पूर्ण होत आहेत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १७ व्या लोकसभेतील शेवटचे भाषण केले.

अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी ते बोलत होते. संसदेत राम मंदिराबाबतचा आभार प्रस्ताव सादर करण्यात आला. यावर विविध नेत्यांची भाषणे झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेवटी भाषण केले. आज मोदींनी गेल्या पाच वर्षातील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आमच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात अनेक पिढ्यांची प्रतीक्षा संपली, असे म्हटले. आमच्या कार्यकाळात अनेक रिफॉर्म झाले असून हे सर्वकाही गेमचेंजर ठरले आहेत. २१ व्या शतकाचा मजबूत पाया यामुळे घातला गेला. एका मोठ्या बदलाच्या दिशेने देश वेगाने पुढे गेला आहे. यामध्येही सभागृहातील सर्व सहका-यांनी खूपच चांगले मार्गदर्शन केले. मला आनंद आहे की, आपल्या अनेक पिढ्या ज्या गोष्टींची वाट पाहत होत्या, अशी बरीच कामे या १७ व्या लोकसभेच्या माध्यमातून पूर्ण झाले आहेत.

अनेक पिढ्यांनी एक संविधानाची वाट पाहिली होती. पण प्रत्येकवेळी संविधानात एक भेग पाहायला मिळत होती. एक दरी दिसत होती, एक स्थिरता दिसत होती. पण याच संसदेने कलम ३७० हटवून संविधानाला पूर्ण रुप दिले आणि त्याचे प्रगतीकरण झाले. ज्या-ज्या महापुरुषांनी संविधान बनवले, त्यांचा आत्मा आपल्याला आशीर्वाद देत राहिल. ७५ वर्षांपासून आपण इंग्रजांनी दिलेल्या दंड संहितेत जगत आलो. पण आता आपण गर्वाने पुढील पिढीला सांगू की ७५ वर्षे भलेही आम्ही दंड संहितेत जगलो. पण आता पुढची पिढी ही न्याय संहितेत जगेल. या पाच वर्षांत मानवजातीने शतकातील सर्वांत मोठ्या संकटाचा सामना केला. कोण वाचेल, कोण नाही, कुणी कुणाला वाचवू शकेल की नाही, घरातून बाहेर पडणेही कठीण झाले होते. तरीही संसदेचे काम झाले. अध्यक्षांनी काम थांबू दिले नाही, असेही पंतप्रधान म्हणाले.

१७ व्या लोकसभेने अनेक नवे मापदंड दिले
१७ व्या लोकसभेने अनेक नवे मापदंड ठेवले. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होण्याचा आपण उत्सव साजरा केला. या कालखंडात जी-२० परिषदेची अध्यक्षता भारताला मिळाली. संसदेचे नवे भवनही याच कार्यकाळात झाले, अशा शब्दांत मोदींनी गेल्या पाच वर्षांच्या कामाची माहिती दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR