शिरूर अनंतपाळ तालुक्यात ७ हजार मतदारांची नावे कपात
शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेंतर्गत तालुक्यातील मयत, स्थलांतरित, दुबार आणि गैरहजर मतदारांची पडताळणी सुरू आहे. तालुक्यातील एकूण ६८ हजार ८११ मतदारांपैकी ७ हजार २४० मतदारांची नावे विविध कारणांमुळे कमी करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर मतदारांना आपले नाव मतदार यादीत कायम ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने अंतिम संधी दिली आहे. यासंदर्भात शुक्रवारी (ता. २७) तहसील कार्यालयात तालुक्यातील सर्व बीएलओ सुपरवायझर आणि विविध राजकीय पक्षांच्या बूथ लेव्हल एजंट (बीएलए) यांची बैठक घेण्यात आली. तहसीलदार किशोर यादव यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार लालासाहेब कांबळे, गोरखनाथ पदकोंडे, रामानंद कोठेकर आणि सहायक गटविकास अधिकारी रवीद्र साचणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक झाली.
या बैठकीत अरऊऊ प्रवर्गातील मयत, स्थलांतरित, दुबार आणि गैरहजर मतदारांच्या गणना पत्रकांची तपासणी करून आवश्यक माहिती भरण्याबाबत सूचना देण्यात आल्या. ३० नोव्हेंबरपर्यंत संबंधित मतदारांच्या घरोघरी जाऊन चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यादीत नाव कमी झालेल्या मतदारांना आपले नाव कायम ठेवायचे असल्यास संबंधित बीएलओकडे नव्याने गणना पत्र भरून देणे आवश्यक आहे. त्यासोबत अॅनेक्स्चर ब आणि क जोडणे बंधनकारक आहे.
यासाठी शनिवार (ता. २८) आणि रविवार (ता. २९) नोव्हेंबर रोजी प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पात्र मतदारांनी या संधीचा लाभ घेऊन आपले नाव मतदार यादीत कायम ठेवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह मतदारांनी संबंधित बीएलओशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.बैठकीस निवडणूक कर्मचारी प्रताप शिंदे, बालाजी सूर्यवंशी, भाग्यश्वर बोराळे आणि सचिन शिंदे उपस्थित होते. मतदार कपातीचा तपशील एकूण मतदार ६८,८११, गणना पत्रांचे डिजिटायझेशन : ६१,५७१, मयत मतदार : २,०३३, स्थलांतरित मतदार : ४,३९१, दुबार मतदार : ६६९, गैरहजर मतदार : १४४, इतर : ३, एकूण कमी झालेले मतदार : ७,२४०. इतके आहे.त
















