24.2 C
Latur
Monday, July 1, 2024
Homeसोलापूरमोडनिंबमधील २ जि. प शाळांच्या १५ खोल्या धोकादायक

मोडनिंबमधील २ जि. प शाळांच्या १५ खोल्या धोकादायक

माढा : मोडनिंब येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये वर्गखोल्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. दोन्ही शाळेत पंधरा वर्गखोल्या धोकादायक झाल्याने दोन सत्रांत शाळा भरविण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे. जवळपास ८५० विद्यार्थी असलेल्या या दोन्ही शाळांच्या पटसंख्येवर याचा परिणाम होण्याची भीती शिक्षणप्रेमी नागरिकांतून व्यक्त होत आहे.

मोडनिंब येथे एकाच आवारात जिल्हा परिषदेच्या मुलींची व मुलांची अशा दोन शाळा भरतात. मुलींच्या शाळेमध्ये पहिली ते सातवी असे १४ वर्ग भरतात. संगणक कक्ष, प्रयोगशाळा, धान्य कोठार व कार्यालयासह अठरा खोल्यांची आवश्यकता आहे. शाळेकडे उपलब्ध असलेल्या १९ खोल्यांपैकी दहा खोल्या धोकादायक झाल्याने बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे केवळ नऊ खोल्या वापरात आहेत. खोल्यांच्या सुटषक्षधामुळे दोन सत्रात शाळा भरविण्याची कसरत शिक्षकांना करावी लागत आहे. पाचवी ते सातवीचे वर्ग सकाळच्या सत्रात तर पहिली ते चौथीचे वर्ग दुपारच्या सत्रात भरवले जातात.

लगतच असलेल्या जिल्हा परिषदेच्या मुलांच्या शाळेतही १४ पैकी पाच वर्गखोल्या धोकादायक झाल्या आहेत तर चार खोल्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. याही शाळेत वर्गखोल्या कमी पडू लागल्याने व्यवस्थापन समितीने दोन सत्रात शाळा भरवण्याची परवानगी शिक्षण विभागाकडे मागितली आहे. यातून विद्यार्थी व पालकांची गैरसोय होत असल्याने पटसंख्या कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

दोन सत्रात शाळा चालू असल्यामुळे काम धंदा सोडून पालकांचा वेळ ने-आण करण्यात जात आहे. त्यामुळे पालकांना शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सोसावा लागतोय. प्रशासनाने ताबडतोब धोकादायक वर्गखोल्या पाडून नवीन खोल्या बांधाव्यात आणि बांधकाम पूर्ण होईपर्यंत दोन्ही शाळांचे वेळापत्रक एकसारखेच ठेवावे.अशी पालकांची मागणी आहे.
मोडनिंब येथील दोन्ही शाळा गुणवत्तेत अग्रेसर आहेत. नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेत या दोन्ही शाळांनी आपला ठसा उमटविला आहे. येथील मुलींच्या शाळेची नुकतीच केंद्र सरकारच्या पीएम श्री योजनेसाठी निवड झाली आहे. यामुळे शाळेच्या भौतिक विकासात वाढ होणार आहे. शाळा दोन सत्रात असल्या तरी शैक्षणिक तास पूर्ण केले जातात. पालकांनी गैरसमज करून न घेता शाळेस सहकार्य करावे. असे कुर्डुवाडी पंचायतसमिती चे गटशिक्षणाधिकारी विकास यादव म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR