जयपूर : राजस्थानमध्ये अंमलबजावणी संचालनालयाच्या म्हणजेच ईडीच्या दोन अधिकाऱ्यांना लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. चिटफंड प्रकरणात गुन्हा नोंदवण्यापासून रोखण्यासाठी दोन्ही अधिकाऱ्यांनी १७ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. राजस्थान लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोने (एसीबी) एका निवेदनात म्हटले आहे की, ईडीच्या दोन अधिका-यांना लाच घेताना पकडले आहे. एसीबीच्या टीमने ईडीच्या दोन निरीक्षकांना १७ लाख रुपये घेताना पकडले आहे. या ईडी निरीक्षकांच्या जागेचीही एसीबी झडती घेत आहे.
काही दिवसांपूर्वी ईडीने राजस्थानचे माजी शिक्षण मंत्री आणि काँग्रेस नेते गोविंद सिंह दोतासरा यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी छापे टाकले होते. ईडीचे हे छापे जयपूर, दौसा आणि सीकरमध्ये टाकण्यात आले होते. पेपर लीक प्रकरण, मनी लाँड्रिंग आणि हवालाद्वारे पैसे हस्तांतरित केल्याप्रकरणी या नेत्यांविरोधात ईडीकडे गुप्त तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. नुकतीच आरपीएसी सदस्य बाबूलाल कटारा यांची चौकशी आणि काही कोचिंग ऑपरेटर्सच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
त्याचवेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी लिहिले होते की, राजस्थानच्या महिलांसाठी काँग्रेस हमी लॉन्च केल्यानंतर, ईडीने राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंग दोतासराच्या घरावर छापा टाकला. तसेच वैभव गेहलोतला चौकशीसाठी बोलवले. राजस्थानमध्ये ईडीचा रेड रोझ होत आहे, कारण काँग्रेसने दिलेल्या हमींचा लाभ राजस्थानमधील महिला, शेतकरी आणि गरिबांना मिळावा, असे भाजपला वाटत नाही.