नवी दिल्ली : पंजाब पोलिसांनी पाकिस्तानी आयएसआय निगडीत २ गुप्तहेरांना अटक केली आहे. पलाक शेर मसीह आणि सूरज मसीह असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. भारतीय सैन्याची गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप दोघांवर आहे. या दोन्ही आरोपींनी भारतीय सैन्याची छावणी, एअरबेस आणि अन्य संवेदनशील क्षेत्राचे फोटो, माहिती शत्रू देशाला दिल्याचे तपासात उघड झाले आहे. ही सर्व माहिती जेलमध्ये बंद गँगस्टर हरप्रीत सिंग उर्फ पिट्टूच्या हॅप्पी नेटवर्कच्या माध्यमातून आयएसआय पाठवली जात होती.
पंजाब पोलिसांनुसार, अटकेतील आरोपींचं गुप्तहेर नेटवर्क असू शकते, जे सोशल मीडियावर बनावट कागदपत्राच्या आधारे सैन्य ठिकाणांवर पोहचून तिथली गोपनीय माहिती गोळा करत होते. या प्रकरणी ऑफिसिएल सिक्रेट अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी या दोघांच्या अटकेची बातमी पोस्ट केली आहे. पंजाब पोलिस देशाच्या सुरक्षेशी तडजोड करणा-या कुठल्याही किंमतीत सोडणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. ही निर्णायक कारवाई असून येणा-या काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
या दोन आरोपींनी पाकिस्तानला काय काय माहिती दिली, त्यामागे त्यांचा हेतू काय होता या सर्व प्रकाराची चौकशी पोलीस करत आहेत. त्याशिवाय या गुप्तहेरांचे नेटवर्क शोधण्याचे काम पोलिस करत आहे. पलक शेर मसीह आणि सूरज मसीह यांच्याकडे अमृतसर येथील वायू सेनेच्या ठिकाणांची संवेदनशील माहिती आणि फोटो मिळाले आहेत. प्राथमिक तपासात या दोघांचा संबंध पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयशी असल्याचे उघड झाले आहे.