नवी दिल्ली : टाटा समूह लक्षद्वीप या भारतीय केंद्रशासित प्रदेशातील सुहेली आणि कदमत या दोन सुंदर बेटांवर ताज ब्रँडेड रिसॉर्ट बांधणार आहे. इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडने अलीकडेच या दोन बेटांवर ताज ब्रँडचे दोन रिसॉर्ट बांधण्यासाठी करार केला आहे.
हे रिसॉर्ट्स २०२६ मध्ये सुरू होतील. हे दोन्ही रिसॉर्ट स्थानिक संस्कृती आणि पर्यावरणाला धक्का न लावता बांधले जातील. सुहेली आणि कदमत बेटे त्यांच्या निळसर पाण्यासाठी, पांढ-या वाळूच्या किना-यांसाठी प्रसिद्ध आहेत.

लक्षद्वीपला भारतीय पर्यटकांसाठी एक प्रमुख ठिकाण म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीने हे धोरणात्मक पाऊल उचलले आहे. विशेषत: भारत आणि मालदीवमधील संबंध तणावपूर्ण झालेले असताना हा निर्णय घेण्यात आला आहे.
ताज सुहेलीमध्ये ६० बीच व्हिला आणि ५० वॉटर व्हिलासह ११० खोल्या असतील. तर ताज कदमात ११० खोल्या असतील ज्यात ७५ बीच व्हिला आणि ३५ वॉटर व्हिला असतील.