पुणे : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पावसाचा जोर कायम आहे. घाटमाथा, मध्य महाराष्ट्राचा पश्चिम भाग आणि कोकणात संततधार पाऊस पडत आहे. राज्यातील २० धरणे शंभर टक्के भरली असून १० ते १२ धरणांत ७० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. भरलेल्या धरणांतून विसर्ग केला जात आहे.
कोकणातील धरणक्षेत्रांत हलका ते मध्यम पाऊस झाला असून धामणी, तिल्लारी, बारवी, मोडकसागर यासह सर्वच धरणे भरली आहेत. त्यामुळे कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास, गाढी, जगबुडी, वशिष्टी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.
खान्देशातील नंदुरबारमधील मोलगी, वडफळी मंडळात ६५ मिलिमीटर पाऊस झाला. धुळे, जळगाव जिल्ह्यांत शिडकावा झाला. पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असल्याने कृष्णा, भीमा खो-यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत असून अनेक धरणे भरत आली आहेत. नगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत हलका पाऊस झाला. पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहू शकतो असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. विदर्भातील नद्या भरून वाहत असून धरणांतील पाणीपातळी वेगाने वाढत आहे. मराठवाड्यात ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला.