24.2 C
Latur
Monday, July 1, 2024
Homeसोलापूर२१ खासगी तंत्रनिकेतनमधील प्रवेश प्रक्रियेला ९ जुलैपर्यंत मुदतवाढ

२१ खासगी तंत्रनिकेतनमधील प्रवेश प्रक्रियेला ९ जुलैपर्यंत मुदतवाढ

सोलापूर : शासकीय तंत्रनिकेतनसह जिल्ह्यातील २१ खासगी तंत्रनिकेतनमधील प्रवेश प्रक्रियेला ९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनची प्रवेश क्षमता ५७० आहे, पण आतापर्यंत १६०० विद्यार्थ्यांनी अर्ज कले आहेत. खासगी पॉलिटेक्निकमध्ये चार हजारांपर्यंत प्रवेश क्षमता असून त्याठिकाणी देखील सहा हजारांपर्यंत अर्ज आले आहेत. ११ जुलैला तात्पुरती तर १६ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे.

इयत्ता दहावीवरून प्रथम वर्ष प्रवेश, आयटी (दोन वर्षाचा) व बारावी विज्ञान शाखेतून थेट द्वितीय वर्षाला पॉलिटेक्निकला प्रवेश मिळतो. विद्यार्थ्यांची पॉलिटेक्निकसाठी चढाओढ लागली आहे. अर्ज करताना कॉम्प्युटर, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल मेकॅनिकल या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती आहे. अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना ११ जुलै रोजी मूळ कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.

शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. अशोक उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश प्रक्रिया अगदी सुरळीतपणे सुरू आहे. ‘पॉलिटेक्निक’च्या प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत ९ जुलै पर्यंत असूनतात्पुरती गुणवत्ता यादी११ जुलैरोजी प्रसिध्द होईल.आक्षेप नोंदविणे व कागदपत्रे अपलोड करण्यासाठी१२ ते १४ जुलै कालावधी आहे.अंतिम गुणवत्ता यादी१६ जुलैरोजी लागणार असून ऑप्शन फॉर्म भरणे१७ जुलैनंतर सुरू होईल.

शासकीय तंत्रनिकेतन असो किंवा खासगी तंत्रनिकेतनमधील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना एकच अर्ज करावा लागतो. एकाच अर्जावरून विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरण्यास सुरवात झाल्यानंतर गुणवत्तेनुसार त्यांनी निवडलेल्या पसंतीक्रमानुसार त्यांच्या आवडीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळतो. त्यामुळे खासगी तंत्रनिकेतनसाठी वेगळा व शासकीय तंत्रनिकेतनमधील (पॉलिटेक्निक) प्रवेशासाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही, असे कळविण्यात आले आहे.

इयत्ता अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी गुरूवारी प्रसिद्ध झाली. शहर-जिल्ह्यातील नामांकित महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेचे मेरिट दुसऱ्या यादीतही ८० टक्क्यांच्या खाली आले नाही. बहुतेक महाविद्यालयांमधील विज्ञान शाखेचे ७५ टक्के प्रवेश आता निश्वित झाले आहेत. कमी टक्केवारी (७० ते ७५ टक्के) असलेले विद्यार्थी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन कोट्यातून व विनाअनुदानित तुकडीत शुल्क भरून प्रवेश घेत आहेत.

आता ५ जुलैला तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार असून काही प्रवेश शिल्लक राहिल्यास ९ जुलैला विशेष प्रसिद्ध होणार आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आतापर्यंत विज्ञान शाखेलाच सर्वाधिक पसंती दिल्याची स्थिती असून जिल्ह्यातील अंदाजे आठ हजार विद्यार्थ्यांनी ‘पॉलिटेक्निक साठीही अर्ज केले आहेत. या पार्श्वभूमीवर कला शाखेच्या शिक्षकांना प्रवेश क्षमता गाठण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. अकरावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू होणार आहेत.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR