बंगळुरू : कर्नाटकच्या रामनगर जिल्ह्यात मानवी कवट्या सापडल्याने खळबळ माजली आहे. जिल्ह्यातील जोगनहल्ली गावातील एका फार्म हाऊसमध्ये २५ मानवी कवट्या आढळून आल्या. बलराम नावाच्या व्यक्तीवर कवट्या गोळा करण्यात आल्याचा आरोप आहे.
बलराम मानवी कवट्या गोळ्या करायचा आणि त्याचा वापर जादूटोण्यासाठी करायचा, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. कब्रस्तानात त्याला काही जणांनी पूजा करताना पाहिले. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी बलरामला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे.
काही दिवसांपूर्वी महाशिवरात्रीची अमावस्या संपली. रामनगरच्या जोगनहल्ली गावातील बलराम कोट्याधीश नावाचा व्यक्ती रात्रीच्या सुमारास कब्रस्तानात पूजा करत होता. ग्रामस्थांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी कब्रस्तान गाठले. त्यांनी बलरामला ताब्यात घेतले. त्याच्या फार्म हाऊसवर पोलिसांना अनेक मानवी कवट्या सापडल्या. आम्ही आजोबांपासून अशा प्रकारची पूजा करत असल्याचे बलरामने पोलिसांना सांगितले.
बलरामच्या फार्म हाऊसवर मानवी कवट्या सापडल्याची बातमी गावात पसरताच एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. एएसपी टी. व्ही. सुरेश, बिदादीचे निरीक्षक चंद्रप्पा यांनी घटनास्थळी पोहोचून निरीक्षण केले. त्यानंतर फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. बलरामकडे सापडलेल्या कवट्या, हातापायांची हाडं गेल्या ४ ते ५ वर्षांत गोळा केलेली असावीत, असा पोलिसांचा अंदाज आहे.
बलराम कोट्याधीशला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. बिदादीजवळ एक औद्योगिक क्षेत्र आहे. जमीन खासगी कंपन्यांना देण्यात आली आहे. बलरामने त्याच्या जमिनीवर शेड बांधून घेतले आहे. त्या शेडला श्री स्मशानपीठ नाव दिले आहे. कब्रस्तानातून कवट्या आणून तो त्यांची पूजा करतो.