Homeराष्ट्रीय३ बड्या नेत्यांची काँग्रेसमध्ये एन्ट्री

३ बड्या नेत्यांची काँग्रेसमध्ये एन्ट्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
उत्तराखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. काँग्रेसने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. भाजपचे माजी आमदार राजकुमार ठुकराल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून बसपाचे माजी आमदार नारायण पाल यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे काँग्रेसची ताकद वाढत असल्याची चर्चा आहे.

राजकुमार ठुकराल यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा रंगत होत्या. अखेर उत्तराखंडच्या प्रभारी कुमारी शैलजा यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये हा प्रवेश झाला. ठुकराल यांच्यासोबत भाजपचे माजी आमदार भीमलाल आर्य, माजी महापौर गौरव गौयल, लखन सिंह यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ठुकराल हे एकेकाळी भाजपचे एक खंदे नेते मानले जात होते. मात्र, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी पक्षाविरुद्ध बंड केले आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

यानंतर भाजपने ठुकराल यांना पक्षातून काढून टाकले. इतकेच नाही, तर ठुकराल आता पक्षासाठी प्राधान्यक्रमावर नाहीत, हे भाजपने आधीच स्पष्ट केले होते. २०२२ च्या निवडणुकीत भाजपने ठुकराल यांना रुद्रपूर मतदारसंघातून तिकिट नाकारून शिव अरोरा यांना उमेदवारी दिली आणि पक्षाने त्यांच्यापासून स्वत:ला दूर केले आहे, हे स्पष्ट केले.

राजकुमार ठुकराल यांच्याप्रमाणे नारायण पाल यांनी देखील पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पाल हे आधी काँग्रेसमध्ये होते, नंतर बहुजन समाज पक्षात (बीएसपी) सामील झाले आणि आता काँग्रेस पक्षात परतले आहेत. दरम्यान काँग्रेसमध्ये होत असलेल्या पक्ष प्रवेशाने काँग्रेस मजबूत स्थितीत येत असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR