पुणे : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात बाल न्यायालयाने दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी सुरु आहे. अपघातामध्ये दोन जणांचा जीव घेणा-या त्या अल्पवयीन आरोपीकडून तिनशे शब्दांचा निबंध लिहून घेण्यात आलेला आहे. इतर शिक्षेच्या अंमलबजावणीची प्रक्रियादेखील सुरु झाली आहे.
पुण्यातल्या कल्याणीनगर भागात अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात पोर्शे कार चालवत दोघांना चिरडले होते. या अपघातामध्ये दोन अभियंत्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर अल्पवयीन मुलाच्या उद्योगपती कुटुंबाने त्याला वाचविण्यासाठी अनेक गैरप्रकार केले. त्याचे ब्लड सॅम्पल बदलून चुकीचे रिपोर्ट कोर्टासमोर सादर केले. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी अल्पवयीन मुलाचे आजोबा, वडील आणि आईला अटक केली आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलाने अलिशान पोर्शे कारने दोघांचा जीव घेतल्यानंतर बाल न्याय मंडळाने शिक्षा त्याला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याचे आदेश दिले होते. याशिवाय त्याने व्यसनांवर नियंत्रण मिळवून समुपदेशन घ्यावे आणि वाहतूक पोलिसांसोबत वाहतूक नियोजनाचे काम करावे, अशा शिक्षेचे आदेश दिले होते.
त्यानुसार त्या अल्पवयीन आरोपीने बाल न्याय मंडळापुढे तिनशे शब्दांचा निबंध सादर केला आहे. समुपदेशन आणि वाहतूक नियमांचा अभ्यास करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयासोबत काम करणे, यासारख्या इतर अटींचे पालन करण्यासाठी प्रक्रिया देखील सुरू आहे.