जेरुसलेम : इस्राईली शहरांवर ७ ऑक्टोबर रोजी गाझामधील अतेरिकी संघटना हमासने हल्ला केला होता. यानंतर इस्राईल गाझा पट्टीत आक्रमकपणे हल्ला करत आहे. इस्राईली लष्कराने गाझा पट्टीमध्ये ग्राउंड ऑपरेशनही राबवले आहे. आता इस्राईली लष्कराने याबाबत माहिती दिली आहे. इस्रायली लष्कराने (आयडीएफ) म्हटले आहे की, गाझा पट्टीमध्ये २७ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या इस्रायली सैन्याच्या ग्राउंड ऑपरेशनमध्ये आतापर्यंत एकूण ३२ इस्रायली सैनिक मारले गेले आहेत. बुधवारी, इस्राईली लष्कराने आपल्या स्पेशल फोर्स युनिटच्या एका सैनिकाच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. इस्त्रायली हवाई दलाच्या शालदाग युनिटचा सार्जंट फर्स्ट क्लास जोनाथन चेझरचा उत्तर गाझामधील संघर्षांदरम्यान मृत्यू झाला आहे.
आयडीएफने आपल्या मृत सैनिकांची यादीही जारी केली आहे. यात संघर्ष सुरू झाल्यापासून मारल्या गेलेल्या ३५० इस्रायली सैनिकांची नावे आहेत. ७ ऑक्टोबरला हमासने केलेल्या हल्ल्यात यापैकी बहुतांश सैनिक मारले गेले आहेत. तसेच गाझामधील आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंगळवारी ठार झालेल्या २४१ लोकांपैकी निम्मे लोक दक्षिण गाझामधील होते. इस्राईलने उत्तर गाझापेक्षा दक्षिण गाझा सुरक्षित असल्याचे म्हटले होते. लोकांना उत्तरेकडील भाग रिकामा करून दक्षिणेकडे जाण्यास सांगितले आहे. हमासच्या आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, इस्राईलने मंगळवारी एकूण २७ हल्ले केले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गाझामध्ये १८ रुग्णालये आणि ४० आरोग्य केंद्रे कार्यरत नाहीत. संघर्षात आतापर्यंत १९३ आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
मृतांची संख्या १०५६९ वर
अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाझामधील मृतांची संख्या १०५६९ वर पोहोचली आहे. मृतांमध्ये ४३२४ मुलांचा समावेश आहे. ७ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत मारल्या गेलेल्या लोकांची ही संख्या आहे. इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यात सुमारे १४०० इस्राईली मारले गेले आणि हमासच्या सैनिकांनी २०० हून अधिक लोकांना ओलीस ठेवले.