28.5 C
Latur
Monday, September 23, 2024
Homeक्रीडा३५ दिवस महिला क्रिकेटची मेजवानी

३५ दिवस महिला क्रिकेटची मेजवानी

मुंबई : पुरुष क्रिकेट संघाचा वर्ल्डकपसह द्विराष्ट्रीय क्रिकेट हंगाम संपला असताना आता भारतीय महिला क्रिकेट संघ बलाढ्य इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यास सज्ज झाला आहे. ट्वेन्टी-२०, एकदिवसीय आणि या दोन्ही देशांविरुद्ध कसोटी सामन्यांची ३५ दिवस मेजवानी मिळणार आहे. हे सर्व सामने मुंबई आणि नवी मुंबईत होणार असून सर्वांना मोफत प्रवेश असणार आहे.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ प्रथम इंग्लंडविरुद्ध तीन ट्वेन्टी-२० सामने आणि एक कसोटी खेळणार आहे. यातील पहिला सामना उद्या वानखेडेवर होणार आहे. त्यानंतर १४ ते १७ डिसेंबर या कालावधीत कसोटी सामना होईल आणि ही मालिका संपेल.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट द्वंद्वाची सुरुवात कसोटी सामन्याने होईल. ही कसोटी २१ ते २४ डिसेंबर या कालावधीत होईल. त्यानंतर तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका होईल. यातील अखेरचा सामना ९ जानेवारी रोजी पार पडेल.

पुढील ३५ दिवसांत (५ डिसेंबर ते ९ जानेवारी) सहा ट्वेन्टी-ट्वेन्टी, तीन एकदिवसीय आणि २ कसोटी सामने भारतीय महिला संघ इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.

हरमनप्रीत कर्णधारपदी कायम
हरमनप्रीत कौरकडे कर्णधारपद कायम ठेवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणा-या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकेसाठी नंतर संघ जाहीर करण्यात येईल.

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया, रिचा घोष, अमनज्योत कौर, श्रेयांका पाटील, मन्नत कश्यप, सैका इशाक, रेणुका सिंग ठाकूर, तितास साधू, पूजा वस्त्रकार, कनिका अहुजा आणि मिन्नु मानी.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी संघ – हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया, रिचा घोष, स्नेह राणा, शोभा सतीश, हर्लिन देओल, सैका इशाक, रेणुकासिंग ठाकूर, तितास साधू, मेघना सिंग, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्रकार.

नऊ वर्षांनी मायदेशात महिला कसोटी सामना
भारतीय महिला संघ नऊ वर्षांनंतर मायदेशात कसोटी सामने खेळणार आहे. मायदेशातला अखेरचा कसोटी सामना २०१४ मध्ये झाला होता. या मालिकांद्वारे भारतीय महिला संघ जवळपास तीन महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. भारतीय महिला त्यांचा अखेरचा बहुराष्ट्रीय स्पर्धेतील (हांग चौऊ येथील आशियाई स्पर्धा) २५ सप्टेंबर रोजी खेळला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR