नवी दिल्ली : भारतातील रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येने पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. केंद्रीय परिवहन मंत्रालयाने यासंबंधीची आकडेवारी सामायिक केली असून त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशात रस्ते अपघातात सुमारे १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. ही आकडेवारी चिंताजनक आहे. ताज्या आकडेवारीनुसार, रस्ते अपघातांचे सर्वात मोठे कारण वाहनांचा वेग ठरला आहे. गेल्या वर्षी म्हणजे २०२२ मध्ये ४.६१ लाख रस्ते अपघात झाले आहेत. या अपघातात १,६८,४९१ लोकांचा मृत्यू झाला तर ४,४३,३६६ जण जखमी झाले होते.
२०२२ मध्ये ३.३ लाखांहून अधिक रस्ते अपघातांत वाहनाच्या अति वेगला जबाबदार धरण्यात आले आहे. तसेच, अहवालात अपघातांसाठी बेपर्वा वाहन चालवणे, मद्यपान करून वाहन चालवणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन यांना जबाबदार धरण्यात आले आहे. तसेच मागील वर्षी सीट बेल्ट न लावणाऱ्या १६,७१५ लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. यामध्ये ८,३८४ चालक आणि ८,३३१ प्रवाशांचा समावेश आहे. या अहवालानुसार, २०२२ मध्ये, देशात एकूण ४,६१,३१२ अपघातांची नोंद झाली, त्यापैकी १,५१,९९७ (३२.९ टक्के) राष्ट्रीय महामार्गांवर, १,०६,६८२ (२३.१ टक्के) एक्सप्रेसवेसह झाले. राज्य महामार्गांवर आणि उर्वरित रस्त्यांवर २,०२,६३३ (४३.९ टक्के) अपघात झाले आहेत.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या ‘भारतातील रस्ते अपघात-२०२२’ शीर्षकाच्या या अहवालात असे म्हटले आहे की, वार्षिक आधारावर, रस्ते अपघातांची संख्या ११.९ टक्क्यांनी वाढली आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ९.४ टक्क्यांनी वाढले आहे. अपघातात जखमी झालेल्यांच्या संख्येत १५.३ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
वेगामुळे सर्वाधिक मृत्यू
अहवालात म्हटले आहे की, २०२२ मध्ये, वाहतूक नियमांचे उल्लंघन श्रेणी अंतर्गत, सर्वाधिक मृत्यू (७१.२ टक्के) वेगामुळे झाले आहेत. चुकीच्या बाजूने वाहन चालवताना (५.४%) लोकांचा मृत्यू झाला आहे. आकडेवारीनुसार, या कालावधीत दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे १०,००० हून अधिक अपघात झाले आहेत. वाहतुकीचे नियम तोडल्यामुळे झालेल्या अपघातांमध्येही तीव्र वाढ झाली. २०२१ मध्ये २,२०३ वरून २०२२ मध्ये ४,०२१ पर्यंत अपघात झाले आहेत. वर्षभरात ८२.५५ टाक्यांची वाढ झाली आहे.
दुचाकी अपघातात ५० हजार लोकांचा मृत्यू
अहवालानुसार, २०२२ मध्ये दुचाकी अपघातात ५० हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि त्यांनी हेल्मेट परिधान केले नव्हते, असे त्यात नमूद केले आहे. २०२२ मध्ये, हेल्मेट न परिधान केलेल्या एकूण ५०,०२९ लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी ३५,६९२ (७१.३ टक्के) चालक आणि १४,३३७ (२८.७ टक्के) प्रवासी होते.