27.3 C
Latur
Wednesday, April 2, 2025
Homeछत्रपती संभाजीनगर४ आरोपींची हर्सुल कारागृहात रवानगी

४ आरोपींची हर्सुल कारागृहात रवानगी

बीड कारागृहातील मारहाण प्रकरण तुरुंग प्रशासनाचा निर्णय

बीड : सोमवारी बीड कारागृहात वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याची बातमी समोर आली. बबन गित्ते याचा सहकारी असलेल्या महादेव गित्ते याने ही मारहाण केल्याचे सांगितले जात होते. परंतु तुरुंग प्रशासनाने कराड आणि घुले यांना मारहाण झाल्याचे वृत्त फेटाळले आहे. मात्र सोनवणे आणि गित्ते यांच्यात मारहाण झाल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आता महादेव गित्तेसह चार आरोपींनी बीड कारागृहातून हलवण्यात आले आहे.

राज्यातील बीड जिल्हा सध्या चर्चेचे केंद्र बनला आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर या प्रकरणाचा तपासावरून राज्यभर रान पेटले होते. या हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड असलेल्या वाल्मिक कराड याला अटक झाली. त्यानंतर त्याच्यासह इतर आरोपींना बीड कारागृहात ठेवण्यात आले होते. महादेव गित्तेसह ४ आरोपींना बीड जिल्हा कारागृहातून छत्रपती संभाजीनगरमधील हर्सुल कारागृहात हलवण्यात आले.

सोमवारी सकाळी ९.३० वाजता मारहाणीचा झालेल्या प्रकरणानंतर तुरुंग प्रशासनाने हा निर्णय घेतला. मकोकातील आरोपी आणि इतर आरोपी नाश्त्याच्या वेळी एकत्र आले. दोन गट आमनेसामने आल्यावर त्यांच्यात बाचाबाची झाली. त्याचे रुपांतर मारहाणीत झाले. सोनवणे गट आणि महादेव गित्ते यांच्या गटात ही मारहाण झाली. परंतु वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झाली नाही, असे तुरुंग प्रशासनाने पत्र काढून स्पष्ट केले आहे. या दोन्ही गटांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

महादेव गित्तेचा थेट कराडवर आरोप
कारागृहातून महादेव गित्ते याला छत्रपती संभाजीनगरमधील हर्सुल कारागृहात नेण्यात येत होते. त्यावेळी पोलिस बंदोबस्तात असलेल्या महादेव गित्ते याने माध्यमांशी संवाद साधला. जोरजोरात बोलत तो म्हणाला, वाल्मिक कराड, सुदर्शन घुले यांनी आम्हाला धमकवले. या प्रकरणाची सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावी, अशी मागणी त्याने केली. दरम्यान, या प्रकरणानंतर बीडमधील कारागृहात सर्वच काही सुरळीत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. संतोष देशमुख हत्येतील आरोपी बीड कारागृहात असलेल्यामुळे हे प्रकरण संवेदनशील झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR