लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये सार्वजनिक, वैयक्तिक, शाळा व अंगणवाडीमध्ये स्वच्छतेचे सातत्य कायम राहण्यासाठी तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, वैयक्तिक शौचालय बांधकाम व शौचालयाची योग्य देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गत १९ नोव्हेंबर या जागतिक शौचालय दिनानिमित्ताने २ ऑक्टोबर ते ३० डिसेंबर पर्यंत या कालावधीत विशेष अभियान राबविले जाणार आहे.
जिल्ह्यात हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छतेचे सातत्य कायम राहण्यासाठी तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालयांची उपलब्धता या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा २ ची सुरूवात झाली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सदर अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून दि. १९ नोव्हेंबर रोजी या जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक, वैयक्तिक, शाळा व अंगणवाडी शौचालयासंदर्भात दि. ३० ऑक्टोबर ते दि. ३० डिसेंबर या कालावधीत विशेष अभियान राबविले जात आहे.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये सार्वजनिक, वैयक्तिक, शाळा व अंगणवाडी शौचालय बांधकाम करणे, निधी वितरण, देखभाल दुरुस्ती तसेच स्वच्छतेमधील सातत्य याबाबत गृहभेटी देऊन जनजागृती केली जाणार आहे. यामध्ये सार्वजनिक शौचालयामध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करणे, सार्वजनिक शौचालयांना वीज जोडणी उपलब्ध करुन देणे, सार्वजनिक शौचालय परिसर स्वच्छता, कुटूंबस्तर शौचालय परिसर स्वच्छता आणि सुशोभिकरण, नादुरुस्त सार्वजनिक शौचालय, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालयातील नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती व वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम व प्रोत्साहन अनुदान वाटप आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील शाश्वत स्वच्छतेमधील सातत्य कायम ठेवण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी उत्स्फुर्त सहभाग घ्यावा, असे आवाहनही पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मोहन अभंगे यांनी केले आहे.