30.6 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeराष्ट्रीय४० मजूर बोगद्यात ५ दिवसापासून अडकले

४० मजूर बोगद्यात ५ दिवसापासून अडकले

डेहराडून : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे निर्माणाधीन बोगद्यात ४० मजूर पाच दिवसांपासून अडकले आहेत. १२ नोव्हेंबरला सकाळी हा बोगदा अचानक कोसळला. आतमध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी गुरुवारी सकाळी ‘अमेरिकन ऑगर’ मशिन बसवून बचावकार्य नव्याने सुरू करण्यात आले आहे. बुधवारी संध्याकाळी उशिरा भारतीय हवाई दलाच्या हर्क्युलस विमानाने हे यंत्र दिल्लीहून उत्तरकाशीला आणण्यात आले आहे. कामगारांच्या बचावासाठी नॉर्वे आणि थायलंडच्या बचाव पथकांचाही सल्ला घेण्यात येत आहे. ढिगाऱ्याची जाडी पूर्वी ४०-५० मीटर होती, मात्र आता ती ७० मीटर झाली आहे. त्यामुळे बचावकार्याला वेळ लागत आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री व्हीके सिंह गुरुवारी पहाणीसाठी बोगद्याच्या आत पोहोचले. कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी अजूनही २ ते ३ दिवस लागतील असे त्यांनी सांगितले. चारधाम प्रकल्पांतर्गत हा बोगदा ब्रह्मखल आणि यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्क्यरा ते दंडलगाव दरम्यान बांधला जात आहे. १२ नोव्हेंबर (रविवार) रोजी बोगद्याच्या (सिल्क्यरा बोगद्या) प्रवेश बिंदूपासून २०० मीटर अंतरावर अचानक चिखल झाला. त्यामुळे हे कामगार बफर झोनमध्ये अडकले. मलबा ७० मीटरपर्यंत पसरला आहे. अडकलेले मजूर बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील आहेत.

केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह म्हणाले की, बोगद्याच्या आत २ किलोमीटरच्या रिकाम्या जागेत (बफर झोन) मजूर अडकले आहेत. त्यांच्यापर्यंत पाईपद्वारे अन्न आणि पाणी पाठवले जात आहे. त्यांना वाचवण्यासाठी नवीन मशीनचा वापर केला जात आहे. त्याची शक्ती आणि वेग जुन्या मशीनपेक्षा चांगली आहे. आम्ही हे बचाव कार्य २-३ दिवसात पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. बचाव कार्यात वापरली जाणारी ऑगर मशिन बिघडल्यानंतर दुसरी उच्च क्षमतेची अमेरिकन ऑगर मशीन दिल्लीहून मागवण्यात आली असून ती बोगद्यात बसवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

नॉर्वे, थायलंडच्या तज्ज्ञांशी चर्चा
कामगारांच्या सुटकेसाठी बचाव पथकांनी नॉर्वे आणि थायलंडच्या तज्ज्ञांशी चर्चा केल्याचेही केंद्रीय मंत्र्यांनी दुजोरा दिला आहे. यामध्ये १७ दिवस गुहेत अडकलेल्या १२ मुलांची आणि त्यांच्या फुटबॉल प्रशिक्षकाची सुटका करणाऱ्या थाई फर्मचाही समावेश आहे.

२०० लोकांचे पथक २४ तास कार्यरत
कामगारांच्या सुटकेसाठी राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (एनएचआयडीसीएल), एनडीआरएफ, एसडीआरएफ, आयटीबीपी, बीआरओ आणि राष्ट्रीय महामार्गावरील २०० हून अधिक लोकांचे पथक २४ तास कार्यरत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR