न्यूयॉर्क : वृत्तसंस्था
अमेरिकेत सुरू असलेल्या ‘फिफा’ वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. शुक्रवारी झालेल्या ग्रुप बी च्या सामन्यात कॅनडा आणि कतार हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात कॅनडाचे एकतर्फी वर्चस्व पाहायला मिळाले. हा सामना कॅनडाने ६-० ने आपल्या नावावर केला. दरम्यान कॅनडाला विजय मिळवून देण्यात जोनाथन डेव्हिडने मोलाची भूमिका बजावली. त्याने या सामन्यात गोलची हॅट्ट्रिक पूर्ण केली.
हा सामना एकतर्फी होता, पण या सामन्यादरम्यान कॅनडा संघाला मोठा धक्का बसला. सामन्यादरम्यान संघातील प्रमुख खेळाडू इस्माईल कोने दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याला स्ट्रेचरच्या साहाय्याने मैदानाबाहेर घेऊन जाण्यात आले. या सामन्यादरम्यान, कतारच्या २ खेळाडूंना रेड कार्ड देण्यात आले. त्यामुळे कतारला ९ खेळाडूंसह सामना खेळावा लागला. त्यामुळे कॅनडाचा दबदबा आणखी वाढला. कतारचा संघ आधीच या सामन्यात पिछाडीवर होता. त्यामुळे २ खेळाडू बाहेर होणं, हे कतारसाठी मोठ्या धक्क्याहून कमी नव्हते.
कॅनडाने या सामन्यात एकूण ६ गोल केले. यासह इतिहासाला गवसणी घातली आहे. हा सामना जिंकून कॅनडाने ‘फिफा’ वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासातील पहिल्या विजयाची नोंद केली आहे. एकतर्फी लढतीमुळे कॅनडा संघाच्या ताफ्यात जल्लोषाचे वातावरण होते, पण इस्माईल दुखापतग्रस्त झाल्याने खेळाडूंची चिंता वाढली. कोनेला स्ट्रेचरहून बाहेर नेल्यानंतर, मदीबोला रेड कार्ड देण्यात आले. कोने ज्यावेळी मैदानाबाहेर जात होता त्यावेळी तो चाहत्यांचे आभार मानताना दिसून आला. यावरून असे म्हटले जात आहे की, हा कोनेचा ‘फिफा’ वर्ल्डकप स्पर्धेतील शेवटचा सामना असू शकतो.
याआधी लिओनेल मेस्सीने आपल्या पहिल्याच सामन्यात हॅट्ट्रिक पूर्ण केली होती. आता जोनाथन डेव्हिड हा फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत हॅट्ट्रिक पूर्ण करणारा दुसराच खेळाडू ठरला आहे. या विजयासह कॅनडाचा संघ ग्रुप बी मध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. कॅनडाचा पुढील सामना स्वित्झर्लंड संघाविरुद्ध होणार आहे. स्वित्झर्लंड संघाने आपल्या पहिल्या सामन्यात बोस्निया संघावर एकतर्फी विजय मिळवला होता. त्यामुळे स्वित्झर्लंड आणि कॅनडा या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.
















