टिहरी : उत्तराखंडमधील टिहरी येथे भाविकांनी भरलेली बस ७० मीटर खोल दरीत कोसळली, ज्यात ५ लोकांचा मृत्यू झाला आहे. टिहरीचे एसपी आयुष अग्रवाल यांनी याची पुष्टी केली. दुपारी सुमारे साडेबारा वाजता झालेल्या या अपघातात गुजरात, हरियाणा, बिहार, उत्तरप्रदेश, पंजाब, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश आहे.
बस ऋषिकेशमधील दयानंद आश्रमातून २९ लोकांना कुंजापुरी मंदिरात घेऊन गेली होती, येथून परत येत असताना कुंजापुरीझ्रहिंडोलाखालजवळ अचानक बसचे ब्रेक फेल झाले आणि चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. नरेंद्रनगर पोलिस ठाण्याचे दरोगा संजय यांनी माहिती देताना सांगितले की, अपघातानंतर बस (यूके१४पीए१७६९) मधून मृतदेह बाहेर काढण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या ६ लोकांना ऋषिकेश येथील एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे, तर ७ लोकांना नरेंद्रनगर येथील श्री देव सुमन रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
५ मृतांमध्ये ४ महिला आणि १ तरुणाचा समावेश आहे.
या अपघातात पाच लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये दिल्लीच्या अनिता चौहान, गुजरातचे पार्थसाथी मधुसूदन जोशी, महाराष्ट्राच्या नमिता प्रबोध, बंगळूरुचे अनुज व्यंकटरमन आणि सहारणपूर, उत्तर प्रदेशचे आशु त्यागी यांचा समावेश आहे. सर्व प्रवाशांचा मृत्यू घटनास्थळीच झाला होता.

