चंद्रपूर : प्रतिनिधी
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील गिधाडाने तब्बल पाच राज्यांतून प्रवास करत तामिळनाडू गाठले आहे. या गिधाडाचा साधारण ४ हजार किलोमीटरचा हा प्रवास थक्क करणारा आहे. ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’च्या वतीने ‘जीपीएस टॅग’ लावण्यात आलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ‘ताडोबा व्याघ्र प्रकल्पा’तून सोडण्यात आलेल्या या गिधाडाने तब्बल चार हजार किलोमीटरचा प्रवास करून थेट तामिळनाडू गाठले आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त अन्य पाच राज्यांमधून झालेला या गिधाडाचा प्रवास दखलपात्र ठरला आहे.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक किशोर रिठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एन ११’ असा सांकेतिक क्रमांक असलेले हे गिधाड सध्या तामिळनाडूतील कलसपाक्कम तालुक्यात पोहोचले आहे. निसर्गचक्रात, देशातून नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या गिधाडांच्या संवर्धनासाठी ‘बीएनएचएस’ गेली अनेक वर्षे काम करीत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून हरिणायातील पिंजोर येथे ‘बीएनएचएस’ने एक गिधाड प्रजनन केंद्र उभारले आहे. या केंद्रात प्रजनन करण्यात आलेली एकूण २० गिधाडे जानेवारी महिन्यात ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरित करण्यात आली होती.
ताडोबात १० पांढ-या पाठीची गिधाडे आणि पेंचमध्ये १० लांब चोचीची गिधाडे हलवण्यात आली होती. त्यांना येथील जटायू संवर्धन केंद्रामध्ये ठेवण्यात आले होते. यामधील १० पांढ-या पाठीच्या गिधाडांंना ‘जीपीएस टॅग’ लावून ऑगस्ट महिन्यात ताडोबामधील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले होते. यामधील ‘एन-११’ या मादी गिधाडाला सोडल्यानंतर तिने ताडोबा ते छत्तीसगड, छत्तीसगड ते गुजरात आणि आणि गुजरात ते तामिळनाडू असा प्रवास केला आहे.
ऑगस्ट महिन्यात या गिधाडाला सोडल्यानंतर त्याने २०० किमी अंतर कापून छत्तीसगडमधील नारायणपूर गाठले. तेथे त्याच्यावर उपचार करून सप्टेंबरमध्ये पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. त्यानंतर जवळपास ६०० किमी अंतर कापत या गिधाडाने गुजरात गाठले. यादरम्यान त्याने महाराष्ट्रातील नागपूर, अमरावती, अकोला, बुलडाणा, जळगाव, धुळे या जिल्ह्यांमधून उड्डाण केले होते. नंतर गुजरात-महाराष्ट्राच्या सीमेवरील उच्छल तालुक्यातील जामली गावात हे गिधाड जमिनीवर पडलेले सापडले. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार करून पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
त्यानंतर या गिधाडाने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यातून प्रवास केला. गुजरातमधून निघाल्यानंतर या गिधाडाने महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर असा प्रवास करून कर्नाटकात प्रवेश केला. ‘एन-११’ या गिधाडाच्या ताडोबा ते गुजरात या स्थलांतरादरम्यान त्याला दोन वेळा पकडून पुन्हा सोडावे लागले होते. मात्र, गुजरात ते तामिळनाडू या प्रवासादरम्यान त्याला एकदाही पकडावे लागले नाही.