22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रएका महिन्यात ५० हजार पर्यटकांची पर्यटन स्थळांना भेट

एका महिन्यात ५० हजार पर्यटकांची पर्यटन स्थळांना भेट

छत्रपती संभाजीनगर : उन्हाळ्याच्या सुट्टीत देशभरातील पर्यटकांची शहरात बरीचशी वर्दळ वाढली आहे. महिनाभरात जवळपास ५० हजार पर्यटकांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेटी दिल्या आहेत. वेरूळ-अजिंठा लेणी, बीबी का मकबरा पाहण्यासाठी गर्दी आहे. उन्हाळ्याच्या सुटीत शहरातून परराज्यातील पर्यटनस्थळी जाणा-या पर्यटकांची संख्या वाढली आहे. दाक्षिणात्य राज्यांसह मध्य प्रदेश, राजस्थानात सर्वाधिक पर्यटक गेले आहेत. उन्हाच्या काहिलीत स्थानिक पातळीवर वॉटर पार्कच्या पर्यटनाला सर्वाधिक पसंती असल्याचे व्यावसायिक सांगतात.

शाळा-महाविद्यालयांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्याने पर्यटनासाठी देश-विदेशातील पर्यटकांची पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर शहरात वर्दळ वाढली आहे. जागतिक वारसास्थळ असलेल्या अजिंठा-वेरूळ लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे तापमानात घसरण झाली असल्याने स्थानिक पर्यटकांची गर्दी वाढली आहे. वेरूळ-अजिंठा लेणी, दौलताबाद किल्ला, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, बीबी का मकबरा, पाणचक्की, छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, सोनेरी महाल, औरंगाबाद लेणी येथे पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत.

यंदा मोसमी पाऊस लवकर दाखल होणार असला तरी शाळांना १४ जूनपर्यंत सुट्या आहेत. त्यामुळे फॅमिली टुरिझममध्ये वाढ झाली आहे. शहरातील नागरिक पर्यटनासाठी परराज्यातील पर्यटनस्थळी गेले आहेत. त्यासाठी शहरातील टूर ऑपरेटरकडे नोंदणी करण्यात आली. शहरात तीसपेक्षा अधिक टूर एजन्सी असून पर्यटनाचे वेगवेगळे पॅकेजेस आहेत. केरळ, तेलंगण, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांना पर्यटकांचे प्राधान्य आहे. कुलू मनाली, सिमला, जम्मू-काश्मीर येथे जाणा-या पर्यटकांची संख्या वाढली आहे.

ज्योतिर्लिंग दर्शनाचे आयोजन
अयोध्या, वाराणसी, केदारनाथ येथे धार्मिक पर्यटनासाठी शहरातून भाविक गेले आहेत. इतर राज्यातून महाराष्ट्रात आलेल्या पर्यटकांची संख्याही मोठी आहे. शिर्डी येथे विमानतळ झाल्यानंतर शहर आणि परिसरात पर्यटकांचा ओघ वाढला आहे. समृद्धी महामार्गाने कमी वेळेत पर्यटक वेरूळ येथे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वराचे दर्शन घेण्यासाठी येतात. खुलताबाद येथे भद्रा मारुतीचे दर्शन घेऊन पर्यटक परत जातात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR