काठमांडू : नेपाळमधील शे-फोक्सुंडो सरोवराकडे ट्रेकिंगसाठी गेलेले ६ भारतीय पर्यटक बेपत्ता झाले आहेत. हिमालयीन भागात झालेल्या जोरदार बर्फवृष्टीनंतर ही घटना घडल्याचे कळते. बेपत्ता झालेल्या पर्यटकांमध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. डोल्पो बुद्ध ग्रामीण नगरपालिकेच्या वॉर्ड क्र. ४ आणि ८ मधून सरोवराच्या दिशेने जात असताना हे पर्यटक बेपत्ता झाले. त्यांना शेवटचे नुमला पास आणि बागला पास परिसरात पाहिले गेले होते.
धो भागातून फोक्सुंडो सरोवराकडे परतत असताना हे पर्यटक अडकल्याचे डोल्पा जिल्ह्याच्या मुख्य जिल्हा अधिकारी जुनु हमाल यांनी पुष्टी केली आहे. प्रशासन बेपत्ता पर्यटकांचा शोध घेत आहे, परंतु जोरदार बर्फवृष्टी आणि प्रतिकूल हवामानामुळे शोध आणि बचाव कार्यात अडथळे येत आहेत, असे म्हटले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अर्नब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे झालेल्या जोरदार बर्फवृष्टीमध्ये हे पर्यटक डोंगराळ भागात अडकले असावेत, असा अंदाज स्थानिक गाईड्सने व्यक्त केला आहे. खराब हवामान आणि डोंगराळ भागातील धोकादायक परिस्थितीबाबत स्थानिक रहिवाशांनी इशारा देऊनही या पर्यटकांनी आपला प्रवास सुरूच ठेवला होता, असे एका अधिका-याने सांगितले. उंचावरील भागातून परतताना ते बर्फात अडकले असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे.
















