जालना : प्रतिनिधी
आषाढीनिमित्त पंढरपूरला गेलेले वारकरी काळीपिवळीतून गावी परतत असताना दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात ही काळीपिवळी विहिरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात ७ ठार तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. जालना ते राजूर रोडवरील तुपेवाडी शिवारात गुरुवारी सायंकाळी ५ च्या दरम्यान हा अपघात झाला. मृतात चार महिलांचा समावेश आहे.
भोकरदन तालुक्यातील राजूर शिवारातील चनेगाव, तुपेवाडी, राजूर येथील भाविक आषाढीसाठी पंढरपूर येथे पंधरा दिवसांपूर्वी आगस्ती ऋषी महाराज तपोवन यांच्या दिंडीत पायी वारीत गेले होते. गुरुवारी ते परतीच्या मार्गावर असून दुपारच्या वेळी जालना बसस्थानकावर एसटीने दाखल झाले होते. पंढरपूरच्या यात्रेमुळे बसेसची संख्या कमी असल्याने त्यांनी जालना ते राजूर मार्गावर चालणा-या काळीपिवळी (एम.एच.२१,३८५०) या वाहनाने ते चार वाजेदरम्यान राजूरकडे निघाले होते. गावच्या अवघ्या दहा ते बारा किमी अंतरावर असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराने अचानक वळसा घेतला. दुचाकी थेट आडवी झाल्याने चालकाने दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, काळीपिवळी रोडच्या बाजूला पाच फूट अंतरावर असलेल्या विहिरीकडे वळाली. यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने कठडे नसलेल्या विहिरीत जाऊन बस कोसळली. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळ धाव घेऊन मृतदेह तसेच प्रवाशांना विहिरीबाहेर काढले. तासाभरानंतर क्रेनच्या सहाय्याने काळीपिवळी बाहेर काढण्यात आली. काहींना राजूर येथील रूग्णालयात तर काहींना जालना येथील जिल्हा रूग्णालयात दाखल केले.
मृतांची नावे
प्रल्हाद महाजन, प्रल्हाद बिटले, नंदा तायडे, नारायण नेहाळ, चंद्रभागाबाई घुगे (सर्व रा. चनेगाव ता. बदनापूर), ताराबाई भगवान मालसुरे (रा. तपोवन ता. भोकरदन) असे मृत्यू झालेल्या भाविकांची नावे तर रंजना कांबळे (रा. खामखेडा) महिला प्रवाशाचा समावेश आहे.
जखमींची नावे
भगवान मालुसरे (रा. तपोवन), आर. पी. तायडे, सखुबाई प्रल्हाद महाजन (दोघे रा. चनेगाव ता. बदनापुर) बाबूराव हिवाळे रा. मानदेऊळगाव, हिम्मत चव्हाण रा. तपोवन तांडा, ताराबाई गुळमकर रा. चनेगाव, अशोक पुंगळे (रा. राजुर) असे गंभीर झालेल्यांची नावे आहे.