शिकागो : अमेरिकेतील शिकागोजवळ दोन वेगवेगळ्या घरांमध्ये झालेल्या गोळीबारात ७ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती आज अधिका-यांच्या हवाल्याने समोर आली. पोलिसांनी सांगितले की, जोलिएट, इलिनॉयमधील वेस्ट एकर्स रोडच्या २२०० ब्लॉकमध्ये ही गोळीबाराची घटना घडली. गोळीबार करणारा संशयित सध्या फरार आहे. रोमियो नॅन्स असे त्याचे नाव आहे.
जोलिएटचे पोलिस प्रमुख बिल इव्हान्स यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, दोन घरांमध्ये एकूण सात जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेतील संशयित २३ वर्षीय नॅन्स या घरांजवळ राहत होता.
गोळीबाराच्या ८७५ लोक ठार
अमेरिकेत गोळीबाराची ही पहिली घटना नाही. अमेरिकेत मोठ्या प्रमाणात गोळीबार आणि बंदुकींच्या हिंसाचाराच्या घटना वारंवार घडत आहेत. अमेरिकन बंदूक हिंसाचाराच्या घटनांचा अहवाल देणा-या गन व्हॉयलेन्स आर्काइव्हने गोळा केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी महिन्यात आतापर्यंत गोळीबारात ८७५ पेक्षाही अधिक मृत्यूमुखी पडले आहेत.