नवी दिल्ली : हेरगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या भारताच्या ८ नौदल अधिका-यांना कतारच्या कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. पण ही शिक्षेविरोधात भारत सरकारने अपिल करत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता.
भारताच्या या प्रयत्नांना यश आले आहे. कारण कतारच्या कोर्टाने भारताचे अपिल स्विकारले असून त्यामुळे या फाशीच्या शिक्षेचा पुनर्विचारही होऊ शकतो. टाइम्स नाऊने या अधिका-यांच्या कुटुंबातील सुत्रांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे. यात म्हटले की, कतारच्या कोर्टाने भारताचे अपिल स्विकारले आहे. पण याबाबत अद्याप परराष्ट्र मंत्रालयाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तसेच अपिल स्विकारण्यात आल्याने या शिक्षेची अंतिम कर्यवाही होण्यापूर्वी त्याचे परीक्षण केले जाईल. तसेच याप्रकरणी सुनावणीची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल.
नेमके काय घडले होते?
कतारमधील प्रथम वर्ग कोर्टाने गेल्या महिन्यात नौदलाच्या ८ माजी अधिका-यांना हेरगिरीच्या संशयावरुन एक वर्षाच्या तुरुंगवासाच्या शिक्षेनंतर फाशीची शिक्षा सुनावली होती. हे सर्वजण देहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीज अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीत काम करत होते. त्यांच्यावर इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप होता. त्यामुळं त्यांना ऑगस्ट २०२२ मध्ये अटक झाली होती. त्यानंतर मार्च २०२३ मध्ये त्यांच्या खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली. सुनावणीदरम्यान कोर्टाला हे सर्वजण दोषी आढळले, त्यानंतर कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली.
भारताने केले अपिल
या शिक्षेच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर भारताने याप्रकरणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. तसेच अपिलामध्ये या अधिका-यांना त्यांच्या घरी परतण्याला परवानगी देण्याची विनंती केली होती. कतारच्या कोर्टाच्या या निकालावर भाष्य करताना परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते की, या भारतीय अधिका-यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेमुळे आम्हाला धक्का बसला आहे. आम्ही कोर्टाच्या आदेशाच्या कॉपीच्या प्रतिक्षेत आहोत. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या आणि आमच्या लीगल टीमच्या संपर्कात आहोत. आम्ही याप्रकरणात सर्व प्रकारचे कायदेशीर मार्ग अवलंबत आहोत.
कोण आहेत हे अधिकारी?
कतारने ज्या ८ माजी भारतीय नौदल अधिका-यांना हेरगिरीच्या आरोपांखाली फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यांची नावं कॅप्टन नवतेजसिंग गिल, कॅप्टन बिरेंद्रकुमार वर्मा, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर अमित नागपाल, कमांडर पुरनेंदू तिवारी, कमांडर सुगुनाकर पाकला, कमांडर संजीव गुप्ता आणि सेलर रागेश अशी आहेत.