तेलअवीव : गेल्या एक महिन्यापासून इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास, यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धात दोन्ही देशातील हजारो निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात लहान मुलांचा समावेश सर्वात जास्त आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी अनेक देशांनी प्रयत्न केले, पण त्यात यश आले नाही. दरम्यान, युद्ध सुरू झाल्यापासून ८८ कर्मचारी मारले गेल्याचा दावा युनायटेड नेशन्सने केला आहे.
टाईम्स ऑफ इस्रायलच्या रिपोर्टनुसार, संयुक्त राष्ट्रांनी सोमवार दि. ६ नोव्हेंबर रोजी सांगितले की, गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत त्यांचे ८८ कर्मचारी मारले गेले आहेत. एखाद्या युद्धात कर्मचा-यांच्या मृत्यू होणाचा सर्वात मोठा आकडा आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, ७ ऑक्टोबर रोजी युद्ध सुरू झाल्यापासून मृत्यू झालेले कर्मचारी पॅलेस्टिनी निर्वासित एजन्सी वठफहअ चे ८८ कर्मचारी होते.
द टाईम्स ऑफ इस्रायलच्याच रिपोर्टनुसार, युएनने गाझामधील नागरिकांच्या मृत्यूबद्दल संताप व्यक्त केला आणि तात्काळ मानवतावादी युद्धविराम करण्याची मागणी केली. दरम्यान, इस्रायलमधून अपहरण करण्यात आलेल्या लोकांची हमासने सुटका करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी रविवारी जाहीर केले की हमास त्यांच्या लोकांना सोडत नाही, तोपर्यंत इस्रायल हल्ले थांबवणार नाही. गाझामध्ये हमासने अद्याप २४० इस्रायलींना ओलीस ठेवल्याचा दावा करण्यात आला आहे.