24.3 C
Latur
Saturday, December 7, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपासह महायुतीची जोरदार मुसंडी, तर मविआला जबर धक्का

भाजपासह महायुतीची जोरदार मुसंडी, तर मविआला जबर धक्का

मुंबई/पुणे : राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यापैकी जवळपास निम्म्या ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. त्यामध्ये भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांची जोरदार मुसंडी मारल्याचे दिसत आहे. तर काँग्रेससोबतच शरद पवार गट आणि ठाकरे गटाची मोठी पिछेहाट झाली आहे. आतापर्यंत १३२२ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यामध्ये महायुतीने तब्बल ७८८ जागांवर बाजी मारली आहे. तर महाविकास आघाडीला २९२ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाला आहे. तर इतरांना १६२ ठिकाणी विजय मिळाला आहे.

ग्रामपंचातीच्या निकालांमध्ये भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी मिळून ७८८ ठिकाणी विजय मिळवला आहे. त्यामध्ये भाजपाने ३७२ ठिकाणी विजय मिळवला आहे. तर अजित पवार गटानेही जोरदार मुसंडी मारताना २४२ ठिकाणी बाजी मारली आहे. महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट काहीसा पिछाडीवर पडला असून, शिंदे गटाला १७४ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाला आहे.

ग्रामपंचायतींच्या आजच्या निकालांमधून महाविकास आघाडीला मात्र मोठा धक्का बसताना दिसत आहे. आतापर्यंतच्य़ा निकालांमध्ये महाविकास आघाडीने २९२ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे. त्यात काँग्रेसने १२६ ठिकाणी बाजी मारली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने ८८ ग्रामपंचायतींवर कब्जा केला आहे. शरद पवार गटाला बारामतीमध्ये मोठा धक्का बसला असून, येथील ग्रामपंचातींमध्ये अजित पवार गटाने मुसंडी मारली आहे.

आजच्या निकालांमध्ये शिवसेना ठाकरे गटालाही मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंतच्या निकालांमध्ये ठाकरे गट ७८ ग्रामपंचायती जिंकून सहाव्या क्रमांकावर राहिला आहे. तर इतरांनी १६२ ठिकाणी यश मिळवलं आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR