31.2 C
Latur
Monday, June 3, 2024
Homeअंतरराष्ट्रीयजगातील ९२ टक्के लोक धूलिकणांनी त्रस्त

जगातील ९२ टक्के लोक धूलिकणांनी त्रस्त

संयुक्त राष्ट्रांच्या वातावरणविषयक अहवालातील नोंद ‘पीएम२.५’चे प्रमाण आठ ते नऊ पट अधिक

न्यूयॉर्क : जगातील ९२ टक्के लोकसंख्येला अतिसूक्ष्म धूलिकणांचा(पीएम२.५) त्रास होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने निर्धारित केलेल्या मर्यादेहून अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण जास्त आहे.

एवढेच नाही तर २०३० पर्यंत त्यात ५० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम (यूएनईपी) ने २०२१ मध्ये ‘ऍक्शन ऑन एअर क्वॉलिटी’ हा आपला २०१६ चा अहवाल अद्ययावत केला आहे. त्यात विविध देश हवेची गुणवत्ता कशी सुधारू शकतात, यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, सर्वाधिक प्रदूषण असलेली ठिकाणे दक्षिण आणि पूर्व आशिया, पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिका म्हणून ओळखली गेली आहेत. या भागात ‘पीएम२.५’चे प्रमाण उत्तर अमेरिकेच्या तुलनेत आठ ते नऊ पट अधिक असल्याचे आढळले आहे.

वायू प्रदूषणामुळे होणा-या मृत्यूंपैकी निम्म्याहून अधिक मृत्यू चीन आणि भारतात नोंदवले जातात. त्यामुळे या प्रभावित भागात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज व्यक्त करण्यात आली आहे. शहरांच्या विस्तारामुळे हवेचे प्रदूषण अनेक प्रकारे वाढले आहे. शहरीकरणामुळे केवळ औद्योगिकीकरणच होत नाही, तर वाहतूक आणि ऊर्जेचा वापरही वाढतो. ज्यामुळे वायू प्रदूषणाचा स्तर आणखी वाढतो. शहरांमध्ये वाढत्या वायू प्रदूषणाच्या मुख्य कारणांमध्ये वाहने, उद्योग, वीजप्रकल्प आणि कचरा किंवा पिकांचे अवशेष जाळणे इत्यादींमधून निघणारा धूर यांचा समावेश आहे.

वाहतूक हे शहरांमध्ये वायू प्रदूषणाचे एक प्रमुख कारण आहे. वाहनांतून होणा-या वायू उत्सर्जनामुळे वातावरणात नायट्रोजन ऑक्साईड आणि अस्थिर सेंद्रिय संयुगे वाढतात. उद्योगांमुळे सल्फर डायऑक्साईड आणि जड धातूचे कण हवेत सोडले जातात. परिणामी, परिस्थिती आणखी बिघडते. दाट इमारती किंवा निवासी भागांमुळे हवेच्या प्रवाहाचा वेग थांबतो किंवा मंदावतो. प्रदूषक वातावरणाच्या खालच्या भागात राहतात आणि त्यामुळे उष्णता वाढते.

‘पीएम२.५’चे अधिक प्रमाण कुठे?
’वायू प्रदूषणाची पातळी कमी करून विविध व्याधींचा त्रास तसेच दीर्घ आणि अल्पकालीन आजारांचे प्रमाण कमी करणे शक्य आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार हवेतील अतिसुक्ष्म धूलिकणांची (पीएम२.५) वार्षिक सरासरी ५ मायक्रोग्रॅम क्युबिक मीटरपेक्षा जास्त असता कामा नये. ’दक्षिण आणि पूर्व आशिया, पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिकेत अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण अधिक आहे.

दरवर्षी ६० लाख लोकांचा मृत्यू
जागतिक वायू गुणवत्ता अहवालानुसार, प्रदूषित हवेमुळे दरवर्षी ६० लाख लोकांचा मृत्यू होतो. सतत वायू प्रदूषणात राहिल्याने कर्करोग, फुप्फुस आणि हृदयविकार होऊ शकतात. विशेषत: लहान मुलांना रोगप्रतिकारशक्ती कमी होण्यासारख्या घातक समस्यांना सामोरे जावे लागते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR